मुंबई – लोक लग्नाकार्यात लाखोंनी पैसा खर्च करतात. तुम्हीसुद्धा अनेक महागडे विवाह सोहळे पाहिले असतील. भव्यदिव्य लग्नसोहळ्याची गोष्ट तर न केलेलीच बरी! ब्रिटेनमध्ये ४० वर्षांपूर्वी झालेली राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांचा विवाहसोहळा खूपच भव्य झाला होता. पण चाळीस वर्षांपूर्वीच्या लग्नाची आता का चर्चा होत असेल?
ऐका तर, त्यांच्या लग्नाच्या केकचा तुकडा चाळीस वर्षांनंतर चक्क १,८५० पाउंड म्हणजेच जवळपास १ लाख ९० हजार रुपयांमध्ये विकला गेला. या केकच्या तुकड्याला फ्लोरल केकच्या डब्यात सांभाळून ठेवण्यात आले होते. नुकतीच त्याचा लिलाव झाला. एक छोटा केकचा तुकडा लाखोंच्या किमतीत विकला जाणे काल्पनिकच गोष्ट वाटते, पण ही सत्य घटना आहे.
केकचा हा शाही तुकडा २३ अधिकृत केकपैकी एक आहे, जो नवदांपत्याने आपल्या लग्नात वाढला होता. केकच्या आयसिंग आणि बदामाच्या मिठाईने तयार बेसवर शाही कोट ऑफ आर्म्सना सोनेरी, लाल, निळे आणि चांदीच्या वर्खाने सजलेल्या डिझाइनला विशिष्ट स्वरूपात दर्शविण्यात आले होते. हा तुकडा क्विन मदरच्या स्टाफमधील एक सदस्या मोया स्मिथ यांना देण्यात आला होता. त्यांनी तुकड्याला सुरक्षित ठेवले होते. त्यावर २९ जुलै १९८१ ही तारीख होती.
बीबीसीने वृत्त दिले की, स्मिथ यांनी तुकडा एका जुन्या केकच्या डब्यात ठेवला होता. त्यावर हाताने लिहिलेले एक लेबल चिकटवले होते. त्यावर खबरदारीने स्पर्श करा-राजकुमार चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांच्या लग्नाचा केक असे लिहिले होते. त्यांच्या कुटुंबियांनी हा केक २००८ मध्ये एका संग्राहकाला विकला होता. या लिलावात जगभरातील अनेक लोकांनी सहभाग घेतला होता. बुधवारी गेरी लेयटन यांना विक्री करण्यात आला. या तुकड्याच्या विक्रीतून फक्त ५०० पाउंड मिळण्याची आशा होती. परंतु केकच्या तुकड्याला मिळालेल्या किमतीमुळे लिलाव करणारे लोक आश्चर्यचकित झाले आहेत.