नाशिक : इगतपुरी तालुक्यातील एकलव्य आश्रमशाळेत नुकत्याच सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरचे ऑक्सीजन संयत्र आपत्कालीन वीजपुरवठ्या अभावी कार्यान्वित होऊ शकत नव्हते. मात्र रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने समयसूचकता दाखवत आर्थिक मदतीचा हात देत माणुसकीचे दर्शन घडविले. या मदतीमुळे येथील कोविड सेंटरचा ऑक्सीजन सुरु झाला आहे.
बहुतांश मदतीचा ओघ शहरातील निकड दूर करण्यासाठी वापरला जात असताना येथील माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी याकामी पुढाकार घेतला आणि रोटरी क्लब ऑफ नाशिकचे माजी अध्यक्ष अनिल सुकेणकर यांच्याशी संपर्क साधला. सुकेणकर यांनी यासंबंधी तातडीची निकड लक्षात घेऊन ताबडतोब आपल्या मित्रांकडून सुमारे ६० हजारांची मदत गोळा केली. रोटरी क्लब ऑफ नाशिकचे सचिव विजय दिनानी यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब चार बॅटरी आणि एक इन्व्हर्टरचे सेट खरेदी करण्यात येऊन दोन दिवसाच्या आत एकलव्य आश्रम शाळा येथे पोचवून कार्यान्वित करण्यात आले.
एस. व्ही. कोगेकर, एस. व्ही. मोडक, डी.एम. रहाणे आणि पी. एन. सराफ यांच्या देणगीतून हा प्रकल्प साकार करण्यात आला. आता येथील ऑक्सिजन संयत्र सुरळीत सुरू झाले असून, जवळपासच्या ग्रामीण भागातील सर्व आदिवासी बांधव या सोयीचा लाभ घेत आहेत. दुर्लक्षित क्षेत्रात वेळीच मदत पोचविण्यात आल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे व देणगीदारांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोविड महामारीच्या काळात रोटरी बांधवांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, सर्व स्तरातील गरजवंतांना मदत पोचविण्यात येत आहे. रोटरी रुग्णसेवा प्रोजेक्टच्या माध्यमातून गरजू रुग्णांना ऑक्सीजन संयंत्र तसेच दीर्घ आजारांना सामोरे जाणाऱ्या रुग्णांसाठी लागणारे मेडिकल साहित्यही नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. रोटरीच्या सेवा उपक्रमांत सर्वांनी सहभागी व्हावे व आर्थिक मदतही करावी असे आवाहन रोटरीच्या अध्यक्षा मुग्धा लेले आणि कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर ओमप्रकाश रावत यांनी केले आहे.