नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सच्या अध्यक्षपदी २०२५-२६ या वर्षासाठी रोटे.कैलास सोनवणे तर सचिवपदी रोटे.अजय चव्हाण व रोटे. धिरेंद्र वाघ आणि कोषाध्यक्ष म्हणून रोटे. सौ. शर्मदा गोसावी यांची निवड झाली. या सर्वांच्या निवडीचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
क्लबचे मार्गदर्शक व मुख्य सल्लगार रोटे. धनंजय बेळे आणि क्लबच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.पदग्रहण सोहोळा मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच होणार आहे.
रोटरी ही २२० हून अधिक देशात कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरची संघटना आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत या संघटनेने पोलिओचे भारतासह जगातून निर्मूलन व्हावे यासाठी दिलेल्या भरीव योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झाली आहे. त्याच्याबरोबर विविध कारणांमुळे ज्यांचे शिक्षण अर्धवट राहिले अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे,खेडे दत्तक घेऊन त्यांचा विकास करणे,स्वछता गृह बांधून देणे,विविध शाळांचे बांधकाम करणे आदी अनेक उपक्रम राबविण्यात रोटरी अग्रेसर असते.अशा संघटनेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळाली हा माझा बहुमानच समजतो,असे रोटे. कैलास सोनवणे यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सांगितले.आपल्या कारकिर्दीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीचे नांव उज्ज्वल होईल अशी कामगिरी करण्यासाठी आपण आपले सर्वस्व पणाला लावू,असा विश्वासही सोनवणे यांनी यावेळी व्यक्त केला.
रोटे.कैलास सोनवणे हे इंद्रजीत टेक्निकल इन्स्टिट्यूट या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेचे संचालक असून त्यांना सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे महिला प्रशिक्षण व स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्सशी गेल्या आठ वर्षापासून ते संलग्न असून विविध पदांवर काम केलेले असल्यामुळे त्यांना मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. रोटे.अजय चव्हाण हे स्थापत्य विशारद असून बांधकाम खाते व विविध स्थापत्य विभागांमध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे. जेसीज या सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवरची विविध पदे त्यांनी भूषवलेली असून त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहेत.तसेच रोटरी क्लब ऑफ नासिक नाईन हिल्स ची ही विविध पदे भूषवलेले आहेत.
दुसरे सचिव रोटे धीरेंद्र वाघ हे राजसन इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचे संचालक असून विविध शासकीय कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो स्वतः पुढाकार येऊन अनेक आदिवासी पाड्यांवरील शाळांमध्ये व आदिवासी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था,पाण्याच्या टाक्या, इत्यादी कामे त्यांनी स्वयंस्फूर्तीने रोटरीच्या माध्यमातून केलेली असून सातत्यानं दिव्यांग मुलांना मदत करण्याकरता नवरास हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो
कोषाध्यक्ष रोटे.शर्मदा गोसावी यांनी इनरव्हील क्लबच्या माध्यमातून विविध सामाजोपयोगी कार्य केले आहेत. मुंबई व नाशिक येथे असतांना त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी विशेष कार्य केल्याने त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्समध्येसुद्धा त्या अग्रेसर असतात. क्लबशी संस्थापनेपासून त्या जोडल्या गेलेल्या आहेत हे विशेष.
रोटरी क्लब ऑफ नाईन हिल्स नाशिकच्या अध्यक्षपदाची धुरा यापूर्वी विजया जोशी,विराज गडकरी,वैभव चावक प्रेरणा बेळे,कल्पना शिंपी, प्रकाश ब्राह्मणकर, धनंजय बेळे यांनी भूषविली आहे.