नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाला सर्विकल कॅन्सरपासून मुक्त करण्यासाठी कॅन्सर पेशण्ट्स ऐड् असोसिएशनने (सी.पी.ए.ए.) पुढाकार घेतला. त्यांच्या सहकार्याने रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०, रसिकलाल धारीवाल हॉस्पिटलतर्फे नाशिकसह जिल्ह्यात १३ ठिकाणी लस देण्यात आली. ९ ते १८ वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित राबविण्यात आली. तब्बल २ हजार मुलींचे लसीकरण करण्यात आले. नॅबच्या ३५ दृष्टीबाधीत मुलीही सहभागी झाल्या.
गर्भाशयमुख कॅन्सर हा ह्युमन पॅपीलोमा या व्हायरसमुळे होतो. मात्र हा एकमेव कॅन्सर आहे, ज्याचे लसीकरण शक्य आहे. या गर्भाशयमुखाच्या कर्करोगावर एचपीव्ही लसीच्या साह्याने आळा घातला जाऊ शकतो. उद्घाटनप्रसंगी सीपीएए टीमच्या संचालिका डॉ. नूपुर खरे यांनी असे सांगून सन २०३० भारत या कर्करोगातून मुक्ती मिळवेल असा विश्वास व्यक्त केला.यावेळी डॉ.संगिता लोढा, सतिश बोरा, जे.सी.भंडारी आदी उपस्थित होते.
नाशिकमध्ये सिडको परिसर तसेच पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर, सटाणा येथे हा लसीकरण उपक्रम राबवण्यात आला. तब्बल ७०० मुली आदिवासी भागातील होत्या. रसिकलाल धारिवाल हॉस्पिटलच्या वतीने शिबिराच्या उदघाटनप्रसंगी मुंबईचे सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सी.बी. छाजेड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजिंदर खुराना व सचिव वीरेंद्र पात्रीकर, लसीकरण मोहीम प्रमुख रोटे. डॉ.संगीता लोढा, तसेच आरएमडी हॉस्पीटलचे अध्यक्ष नंदलाल पारख, सचिव सतीश बोरा, सहसचिव डॉ. सुनील बाफना यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. यापुढेही लसीकरण मोहीम राबवली जाईल. पुढील महिन्यात यवतमाळ व अमरावती येथे सीपीएएच्या सहकार्याने रोटरीतर्फे अशीच लसीकरण मोहीम होईल.