नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील गरजू २५० कुटुंबांना काल धूर विरहित चुलींचे वाटप करण्यात आले आहे. धूर विरहित चुली मिळाल्याने येथील आदिवासी महिलांनी आनंद व्यक्त केला असून वर्षानुवर्षे धुराच्या त्रासातून मुक्तता मिळाली आहे.
पेठ तालुक्यातील आदिवासी भागातील झरी, बेहेरेपाडा, अंबास, नवीनपाडा, पळशी आणि हेदमाळ या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्यांना महिला वर्षानुवर्षे पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करतात. मात्र यामुळे होणाऱ्या धुरामुळे त्यांना निरनिराळ्या आरोग्य विषयक समस्यांना सामोरे जावे लागत. रोटरी क्लब ऑफ नाशिकने येथील महिलांची हीच गरज ओळखून तब्बल २५० कुटुंबांना इंधन बचत, पर्यावरण रक्षण अशी वैशिष्ट्ये असलेल्या धूर विरहित चुलींचे वाटप करून धुराच्या त्रासातून मुक्त केले आहे.
या प्रकल्पास सिन्नर येथील ऑटोकॉम्प इंडिया प्रा. लि. कंपनीचे आर्थिक सहाय्य (सीएसआर) लाभले. या चूल वितरणप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव तथा सीएसआर संचालक प्रफुल बरडिया, सचिव विजय दिनानी, डॉ. श्रिया कुलकर्णी, विवेक पेंडसे, निलेश गायकवाड, धनश्री गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. ऑटोकॉम्प इंडियाचे संचालक अनिल साळी अन्य संचालक, रोटरी सदस्या सुजाता राजेबहादूर यांनी मोलाचे सहकार्य केले. याच भागतील बेहेडेपाडा येथे रोटरीच्या आर्थिक सहकार्याने कांडणी यंत्राचा शुभारंभही अध्यक्षा मुग्धा लेले यांच्या हस्ते करण्यात आला.
आदिवासींना दिले अर्थिक स्थैर्य
रोटरी क्लब ऑफ नाशिक गेल्या अनेक वर्षांपासून या दुर्गम भागाच्या विकासासाठी कार्यरत आहे. या परिसरातील समाजाच्या गरजा लक्षात घेवून घरोघरी शौचालय बांधून देणे, आरोग्य निदान शिबिर, औषधे वाटप यांसारखे कार्यक्रम नेहमीच घेत असून, शेकडो कुटुंबांना मदतीचा हात देवून त्यांना आधार देण्याचे कार्य करीत आहे. याशिवाय काही आदिवासी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्यात रोटरी संस्थेला मोठे यश मिळाले आहे.