नाशिक: रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा घराच्या छतावर ग्राहकांनी कार्यान्वित केल्यानंतर दरमहा वीजबिलामध्ये बचत होऊन, यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. यामुळे आर्थिक फायदा सोबतच दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे तसेच योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि यामध्ये येणाऱ्या अडचणी, तक्रारी व शंका दूर करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले.
केंद्रशासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा २ अंतर्गत सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करून थेट ग्रीडला जोडण्यासाठी असलेल्या या योजनेअंतर्गत नाशिक मंडळातर्गत अर्ज केलेल्या घरगुती वर्गवारीतील वीज ग्राहकांशी संवाद साधण्याकरिता आज ०२ जुलै रोजी शनिवारी महापारेषणच्या प्रशासकीय कार्यालय येथील सभागृहात मेळावा आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ग्राहकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी सदर योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती, उद्देश, शासन निर्णय, परिपत्रके, ऑनलाईन अर्ज प्रकिया व अनुदान या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश रोहणकार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी ग्राहकांनी व एजन्सी प्रतिनिधी यांनी विचारलेले विविध प्रश्न, तक्रारी व शंकांचे निरसन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले
सौर ऊर्जा निर्मिती गती देण्यासाठी व अर्जदारांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये ग्राहकांना योजनेविषयक संपूर्ण माहिती , सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे तसेच निवड सूचीतील एजन्सी समवेत थेट समन्वय करून दिल्यामुळे ग्राहकांनी यावेळी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंचवटी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंते धनंजय आहेर, राजाराम डोंगरे,आनंद देशमुख व प्रेरणा बनकर यांच्यासह नाशिक मंडळातील उपविभागीय अभियंते, ग्राहक व निवड सूचीतील एजन्सी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.