नाशिक : केंद्रशासनाच्या नविन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा २ अंतर्गत सौर ऊर्जेपासून वीजनिर्मितीला प्राधान्याने गती देत छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करून थेट ग्रीडला जोडण्यासाठी असलेल्या या योजनेअंतर्गत नाशिक मंडळातर्गत असलेल्या नाशिक शहर १ व २, नाशिक ग्रामीण व चांदवड विभागातील अर्ज केलेल्या घरगुती वर्गवारीतील वीज ग्राहकांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती, अडचणी, तक्रारी व शंकांचे निरसन करून योजनेचा लाभ देण्यासाठी दि. ०२ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता महापारेषणच्या प्रशासकीय कार्यालय येथे दुर्गा माता मंदिर शेजारी, सिद्धेश्वर नगर, जेल रोड, नाशिक येथे आयोजित केला असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
या मेळाव्यामध्ये सदर योजने अंतर्गत अर्ज केलेल्या ग्राहकांना योजनेविषयक संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे तसेच निवड सूचीतील एजन्सी समवेत थेट समन्वय करून या योजनेचा जास्तीतजास्त ग्राहकांना लाभ देण्याचा प्रयत्न होणार आहे. छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती या कामांना गती देण्यासाठी व अर्जदारांच्या अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर व माणिकलाल तपासे यांच्यासह उपविभागीय अभियंते उपस्थित राहणार आहेत. रुफटॉप सौर योजना टप्पा २ अंतर्गत अर्जदार असलेल्या घरगुती ग्राहकांना यावेळी त्याच्या तक्रारी व शंकांचे निरसन व नाशिक परिमंडलातील निवड सूचीतील एजन्सी यांच्याशी समन्वय करून देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे या योजनेविषयक संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे आदींची माहिती यावेळी देण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
केंद्र शासनाकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी वित्त सहाय्य (अनुदान) देण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेला महावितरणकडून लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर सर्वच वर्गवारीतील ग्राहकांकडून शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जात आहे. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेच्या स्वयंवापरामुळे वीजबिलात होणारी बचत तसेच शिल्लक विजेची विक्री याचा एकत्रित लाभ संबंधित ग्राहकांना होणार आहे.