दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तालुक्यातील लखमापूर येथील भरत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री शेड वरती रात्री दोन वाजेचा एका मादी व नरबिबट्याने पोल्ट्रीच्या शेड वरती चढून रोमान्स सुरु केला. पण, त्यांच्या वजनाने पत्रा तुटला व दोन्हीही बिबटे पोल्ट्रीत पडले यावेळी पहाटे सुमारास शेजारील जनावरे ओरडायला लागल्यानंतर घरातील माणसांनी जनावराकडे बघितले असता त्यांना पोल्ट्रीत बसलेले बिबटे दिसून आल्याची घटना घडली.
या घटनेनंतर क्षणाचाही विलंब न करता पोल्ट्री मालकाने वनविभागाला घटनेची माहिती दिली. मात्र तब्बल दोन तासाच्या विलंबा नंतर फॉरेस्ट अधिकारी घटनास्थळी रवाना झाल्यावर परिस्थितीची पाहणी करता आले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी स्थानिक रेस्क्यू टीमला बोलावले. मात्र रेस्क्यू टीम पोहोचेपर्यंत बिबट्याने ज्या ठिकाणाहून आत मध्ये प्रवेश केला होता. त्या ठिकाणाहून सुमारे दहा ते बारा फूट उंच उडी घेत थेट पत्र्यांवरून पुन्हा सुरक्षित ठिकाणी पळ काढला. मात्र सुदैवाने पोल्ट्रीमध्ये कोंबड्या नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान टळले. तरी शेडचे व पोल्ट्रीच्या सामानाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या अशा प्रकारच्या पोल्ट्री मधील प्रवेशाने मात्र परिसरातील नागरिकांनी मध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून सदर नर- मादी बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
वनविभाग व रेस्क्यू टीम वेळेत घटनास्थळी हजर झाली असती तर दोन्ही बिबट्यांना पकडणे सहज शक्य झाले असते. मात्र बिबट्या पोल्ट्रीत शिरल्यानंतर जवळपास अडीच तीन तासाच्या अवधीमुळे बिबट्याला आलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन तिथून पाळण्यासाठी मोठा वाव मिळाला. जर रेस्क्यू टीम व नागरिकांच्या मदतीने वेळीच प्रयत्न वनविभागाने केला असता तर दोन्ही बिबटे पकडणे वनविभागाला सहज शक्य झाले असते.
पन्नास साठ हजाराचे नुकसान
पोल्ट्रीमध्ये कोंबड्या नसल्या तरी शेडचे मात्र पन्नास साठ हजाराचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान भरपाई सह बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची गरज निर्माण झाली असून यासाठी स्थानिक वन विभागाच्या मदतीसाठी तयार आहे मात्र बिबट्या पकडणे गरजेचे आहे.
भरत दौलत मोगल, पोल्ट्री मालक