मुंबई – तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे उंच मनोरे आपल्याला पावलो-पावली पाहायला मिळत आहेत. इंधनावर चालणार्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यात आली. आगामी काळात अशाच वाहनांची चलती असणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक विमानांची निर्मिती होत असून, कंपन्यांची एकमेकांसोबत स्पर्धाही सुरू झाली आहे. याच स्पर्धेत आता रोल्स रॉयस कंपनीने एव्हिएशन क्षेत्रातील उंच भरारी घेतली आहे.
रोल्स रॉयस कंपनीने आपले इलेक्ट्रिक विमान Spirit of Innovation ला जगातील सर्वात जलद ऑल इलेक्ट्रिक वाहन घोषित केले आहे. हे विमान तीन किलोमीटरपर्यंत ५५५.९ किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेण्यास यशस्वी झाले आहे. विमानाने Siemens कंपनीच्या Extra 330 LE Aerobatic या ई-विमानाचा विक्रम मोडला आहे. सीमेन्सच्या विमानाने २०१७ मध्ये २३१.०४ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने उड्डाण घेतले होते.
रोल्स रॉयसच्या या विमानाने ब्रिटनच्या Ministry of Defence’s Boscombe Down च्या विमान परीक्षण क्षेत्रात १५ किलोमीटरपर्यंत ५३२.१ किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेतले. विशेष म्हणजे या विमानाने सर्वात कमी वेळेत तीन हजार मीटर उंचीवर पोचण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
विक्रमी कामगिरी करताना या विमानाचा कमाल वेग ६२३ किलोमीटर प्रतितास होता. याच वेगामुळे हे विमान जगातील सर्वात वेगवान उड्डाण करणारे ई-एअरक्राफ्ट बनण्यास यशस्वी झाले आहे. या विमानाने केलेल्या जागतिक विक्रमाची पडताळणी एफएआयने केली आहे.
आपल्या विक्रमी उड्डाणादरम्यान या इलेक्ट्रिक एअरक्राफ्टने ४०० किलोवॉटच्या इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. ही मोटर ५०० एचपी पर्यंतची ऊर्जा निर्माण करते. या विक्रमी उड्डाणादरम्यान विमानात टेस्ट पायलट आणि डायरेक्टर ऑफ फ्लाइट ऑपरेशन्स फिल ओडेल्ल हे उपस्थित होते. हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी रॉल्स रॉयसने एव्हिएशन एनर्जी स्टोरेज स्पेशलिस्ट (YASA) सोबत भागिदारी केली होती.