इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
एकीकडे केंद्राने तुरीच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिल्याने तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली कोसळले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारच्या गोंधळामुळे बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुद्धा सुरु होऊ शकलेली नाहीत, परिणामी राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल १००० कोटीचा फटका बसला असून पुन्हा एकदा ऐन मोक्यावर शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जसा भरडला गेला तशीच स्थिती तुरीच्या बाबतीत सुद्धा होताना दिसत आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडं जमिनीवर येऊन किमान आता तरी थोडे गांभीर्य दाखवत तूर खरेदी सुरळीत करावी. अन्यथा या सरकारला शेतकरी भरडल्याशिवाय राहणार नाही.