इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार हे अवघ्या १२४५ मतांनी विजयी झाले. त्यांना १ लाख २७ हजार ६७६ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार प्रा.राम शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली. अंत्यत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत रोहित पवार यांना निसटला विजय मिळाला.
या विजयानंतर त्यांनी रामकृष्णहरि! असे म्हणत सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वप्रथम या विजयाबद्दल कर्जत-जामखेडमधील मतदारांपुढं नतमस्तक होऊन या विजयाचा मी नम्रपणे स्वीकार करतो. आपला विश्वास आणि त्यांचं प्रेम मी कदापि विसरणार नाही.
हा विजय माझा नाही तर कर्जत-जामखेडच्या पवित्र भूमीचा, इथल्या स्वाभिमानी जनतेचा, सामान्य माणसाचा, निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी, सहकारी, मित्र, माझं कुटुंब, ‘मविआ’तील घटक पक्षांचे कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणाऱ्या राज्यभरातील अनेकांनी दिलेला आशीर्वाद आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्माचा हा विजय आहे.
या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं. गेली पाच वर्षे कर्जत-जामखेडला माझ्या कुटुंबासारखं जपलं, प्रत्येक संकटात साथ-सोबत केली. आयुष्याचा पाया रचणारं शिक्षण, विकासाला गती देणारे रस्ते, पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, पर्यटनाला चालना देणाऱ्या अध्यात्मिक स्थळांचा विकास, मतदारसंघात निर्भय आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणं, महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करुन सक्षम बनवणं, त्यांना व्यवसायाच्या नवनव्या संधी उपलब्ध करुन देणं ही कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोविड आणि लंपीसारख्या संकटात इथल्या मायबाप जनतेसोबत ठामपणे उभा राहिलो. दुष्काळात पाणी पुरवणं असो की पीक विमा मिळवून देणं असो या गोष्टी कर्तव्यभावनेतून प्रामाणिकपणे केल्या. ‘एमआयडीसी’साठी आणि या माध्यमातून युवांना रोजगार निर्माण करण्यासाठी केलेले प्रयत्न तर कर्जत-जामखेडकरांना माहितच आहेत. कर्जत-जामखेडच्या मायबाप जनतेने माझ्या प्रत्येक कामात तन-मनाने साथ दिली. माझ्यावर विश्वास ठेवला. संघर्षाच्या कठीण काळात पाठीशीच नाही तर खांद्याला खांदा लावून उभं राहिले, हे मी कधीही विसरणार नाही. ही निवडणूक कसोटी पाहणारी होती. पक्ष फुटला असताना आणि आदरणीय पवार साहेब हे ८५ व्या वर्षी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि विचारांसाठी संघर्ष करत असताना त्यांना साथ देण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्माचा विचार जपण्यासाठी मलाही राज्यभर अनेक सभांसाठी जावं लागलं. या काळात माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मतदारसंघातील प्रचाराची धुरा स्वतः ‘रोहित पवार’ असं समजून माझ्या कर्जत-जामखेडच्या मायबाप जनतेने आपल्या खांद्यावर घेतली, हे तुमचं ‘प्रेम’ मी कदापि विसरणार नाही. माझा प्रत्येक क्षण हा तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या भल्यासाठी, कर्जत-जामखेडच्या विकासासाठी असेल, किंबहुना कर्जत-जामखेडचं कल्याण हेच माझं कल्याण, असं मी मानतो. त्यादृष्टीनेच भविष्यातही काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.
आता निवडणूक संपली, राजकारण संपलं. यापुढं मला मत दिलेल्या मतदारांचाच नाही तर मत दिलेल्या आणि न दिलेल्या सर्वांचा मी लोकप्रतिनिधी आहे. म्हणूनच काम करताना जात, धर्म, गरीब, श्रीमंत, पक्ष असा कोणताही भेदभाव माझ्याकडून कधी झाला नाही आणि यापुढंही कदापि होणार नाही. आता केवळ कर्जत-जामखेडचा विकास हेच माझं ध्येय आहे. या कामात माझ्या कर्जत-जामखेडची मायबाप जनता माझ्या पाठीशी राहिलच, यात कोणताही संशय नाही. माझे राजकीय विरोधक प्रा. राम शिंदे साहेब यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनीही केलेली टीका, एकमेकांवर केलेले आरोप-प्रत्यारोप हे सर्व विसरुन कर्जत-जामखेडच्या विकासासाठी एकत्र यावं. निवडणूक संपल्यामुळं राजकारणाला पूर्वविराम देऊन विकासाचा, समाजकारणाचा, महिला भगिनींना सन्मान देण्याचा, युवांना रोजगार देण्याचा, शेतकऱ्यांच्या घामाला मोल देण्याचा नवा अध्याय आपण एकत्रितपणे लिहू. प्रा. राम शिंदे साहेब हेही आणखी चार वर्षे आमदार असल्याने राजकीय मतभेद विसरुन केंद्र व राज्य सरकारकडून अधिकाधिक निधी आणण्याकामी त्यांनीही सहकार्य करावं, असं मी त्यांना आवाहन करतो.
ज्या कर्जत-जामखेडने मला राज्यात ओळख दिली, काम करण्याची संधी दिली, विश्वास दिला, संघर्ष करण्याची प्रेरणा दिली त्या मतदारसंघाला नवी ओळख निर्माण करुन देण्याचा आणि विकासाचा एक स्वतंत्र चेहरा देण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिलाय आणि तो यापुढंही राहील. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून कर्जत-जामखेड मतदारसंघ हा राज्यात विकासाचं एक नवं मॉडेल निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून मी काम करत असून याकामी यापुढंही सर्वजण सहकार्य करतील, असा विश्वास आहे.
निवडणुकीच्या काळात माझ्याकडून चुकून, जाणते-अजाणतेपणाने कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाविषयी चुकीचा किंवा अपशब्द वापरला गेला असेल, काही चुकीची कृती घडली असेल किंवा कुणाचा अवमान झाला असेल तर या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि विजयाबद्दल आभार न मानता कायमच कर्जत-जामखेडकरांच्या ऋणात राहणं मला आवडेल! रामकृष्णहरि!