इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कर्जत – जामखेड विधान सभा मतदारसंघात जवळके, बावी, बोर्ला, जवळा आदी गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली. यावेळी ते म्हणाले की, या पावसात पिकं वाहून गेली असून अनेक बंधाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. विजेचे पोलही मोठ्या प्रमाणात कोसळल्याने विजपुरवठा विस्कळीत झाला. यासंदर्भात प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्तीची कामं हाती घेण्याच्या सूचना दिल्या. लोकांची प्रचंड गैरसोय होत असून अतिवृष्टीने लोकं हतबल झाले आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन धीर दिला. यावेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळं माझ्या मतदारसंघात सुमारे अडिचशेहून अधिक वीजेचे खांब भुईसपाट झाले असून काही ठिकाणी डीपीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळं वीज पुरवठ्याचा अनेक भागात खोळंबा झालाय. पिण्याच्या पाण्यासाठीही पंप सुरु करता येत नाही, मोबाईलची चार्ज करता येत नाहीत. त्यामुळं लोकांना खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय. याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी केलेल्या विजेच्या विविध कामांचीच बिलं सरकारने न दिल्याने कंत्राटदार आता दुरुस्तीची आणि नवीन कामं करण्यास तयार नाहीत. या बाबीकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं असेरी रोहित पवार यांनी सांगितले.