इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्य_वेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री २०२० मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपण आणि अजितदादा २०२२ मध्ये विरोधी पक्षनेता असताना आपणही राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. पण आज त्यापेक्षाही भयानक परिस्थिती आहे. देवाभाऊ आपल्या पाठीशी केंद्र सरकारची ताकद तर अजितदादा आपल्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळं राज्यात थैमान घातलेल्या अस्मानी संकटातून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी १५-२० हजार कोटींची मदत केली तर काही फरक पडणार नाही, असं मी म्हणतो आणि आपणही विरोधी पक्षनेते असताना म्हणाला होतात. प्रसंगी कर्ज घ्या पण संकटात असलेल्या आमच्या शेतकऱ्याला वाचवा.
त्यासाठी आजच्या कॅबिनेट बैठकीत इतर सगळे विषय बाजूला सारून ओला दुष्काळ आणि सरसकट हेक्टरी ५० हजार मदत जाहीर करा.. तसंच कर्जमाफीची हीच योग्य वेळ असल्याने याचीही आठवण ठेवा. राज्यातील शेतकऱ्यांचे डोळे आपल्या आजच्या निर्णयाकडे लागलेत.