इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेणारी, अर्ज तपासणारी, अर्ज मंजूर करणारी अशा सर्वच यंत्रणा सरकारच्या होत्या, तरीदेखील बोगस अर्ज स्वीकारले गेलेच कसे? लाडक्या बहिणीचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह जेष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस अर्ज असल्याची आकडेवारी तर अतिशय धक्कादायक असून यावरून लाडकी बहीण योजना महायुतीने फक्त राजकीय उद्देश ठेवूनच आणली होती, हेच यातून सिद्ध होते असे संगात आमदार रोहित पवार यांनी या योजनेवर सवाल केला.
ते पुढे म्हणाले की, गरज सरो वैद्य मरो याप्रमाणेच निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुका होताच या सरकारला परकी वाटायला लागली असून एक ना अनेक कारणं काढून या योजनेतून लाडक्या बहिणींची हकालपट्टी करण्याचे काम महायुती सरकारने चालवले आहे. आपल्या राजकीय स्वार्थापायी अगोदर बहिणींना लाडकं म्हणायचं आणि स्वार्थ साधून झाला की त्यांनाच बोगस करायचं हा धंदा सरकारने तत्काळ बंद करावा आणि १५०० चे २१०० ₹ करण्याचे दिलेले आश्वासन अमलात आणावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये याच लाडक्या बहिणी या सरकारचा राजकीय पाणउतारा केल्याशिवाय राहणार नाहीत.