इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाण्यातील शांतीदूत सोसायटीमध्ये अवंती ग्रुपचे विकासक श्रीकांत शितोळे यांनी तीन वर्षात घरं देण्याचं आश्वासन देऊन गोरगरिबांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले मात्र १४ वर्षे उलटून गेली तरी घरं देण्यात आलेली नाहीत. उलट रहिवाशांना अंधारात ठेवून सदर जमीन बँकेकडे गहाण ठेवून ३९८ कोटी रुपये कर्ज उचललं. हे कर्ज आणि नागरिकांकडून बुकिंगसाठी घेतलेले १५० कोटी अशा एकूण तब्बल ४६८ कोटींचा गैरव्यवहार या विकासकाने केला आहे. त्यामुळं सर्वसामान्य माणसाची मोठी फसवणूक झाल्याने त्यांच्यावर उपोषणाची वेळ आलीय. सामान्य माणूस पोटाला चिमटा काढून हक्काच्या घराचं स्वप्न पाहतो, मात्र १४-१४ वर्षे त्यांचा वनवास संपत नसल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी या विषयाकडे लक्ष वेधले.
त्यांनी म्हटले आहे की, विशेष म्हणजे याबाबत कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देऊनही ठाणे पोलीस आयुक्त या विकासकावर कारवाई का करत नाहीत? पोलीस आम्हा विरोधकांचे ऐकत नाहीत हे एकवेळ समजू शकतो, मात्र गृहमंत्र्यांचा आदेश देखील पळला जात नसेल तर हे दुर्दैव आहे. सामान्य माणसाची अशी फसवणूक होत असल्यानेच ती रोखण्यासाठी रेरा कायदा आणला गेला, मात्र तरीही फसवणूक होतच असेल तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कुठं?
आमदार रोहित पवार हे सतत वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधून नागरिकांचे प्रश्न मांडतांना सातत्याने दिसतात. आता त्यांनी ठाण्यातील या गैरव्यवहाराकडे लक्ष वेधले आहे.