इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळतांनाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. पण, आज त्यांनी सिन्नर येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा देण्यास नकार दिला. या पत्रकार परिषदेत कोकाटे म्हणाले की, हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहित नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहित नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लीकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे. तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहे असे म्हटले. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी दुसरा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय..
या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता? असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कोकाटेंनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलं
सकाळी कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, हा इतका छोटा विषय आहे, तो इतका लांबला का ते माहित नाही. ऑनलाईन रमी हा प्रकार तुम्हाला माहित नाही का, तो खेळण्यासाठी त्याला मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट जोडावा लागतो. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लीकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा, ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे. तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहे. यामुळे माझी महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे. ज्यांनी माझी बदनामी केली आहे. त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. विधिमंडळाच्या व्हिडिओ बाबत बोलतांना मंत्री कोकाटे म्हणाले की, मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॅाप – अप येतो, तो मला स्वीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता. मला स्वीप करायला वेळ लागला. पण, तो गेम स्वीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही. तो दाखवला तो ११ सेंकदाचा आहे. ३० सेंकद गेम स्वीप करता येत नाही. तो व्हिडिओ पूर्ण दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आढळले असते.