इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. त्यांनी सहआरोपी केले तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू असेही त्यांनी सांगितले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरीकडे राजकीय घडामोडींना सुध्दा वेग आला होता. त्यातच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर धनजंय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज मुंडे यांनी राजीनामा दिला.
त्यानंतर आता त्यावरही प्रतिक्रिया उमटत असून धनजंय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले. हा राजीनामा नैतिकतेमुळे दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तर विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पाय-यावर जोरदार आंदोलन करुन या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले.