इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याशी संबधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची पर्सनल बाँण्डवर सुटका न्यायालयाने केली आहे. ईडीने त्यांच्यासह काही व्यक्तींविरुध्द मनी लॅन्डरिंग प्रतिबंधक कायदा अतंर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केले होते.
या निर्णयानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय दबावाखाली असलेल्या ईडीने माझ्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असलं तरी या आरोपपत्रालाच माझा विरोध आहे. पण आता प्रकरणाचा चेंडू न्यायालयाच्या ‘कोर्टात’ आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या यंत्रणा जरी सरकारच्या हातचं बाहुलं म्हणून काम करत असल्या तरी माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आज पहिल्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयात उपस्थित राहिलो असता माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि यापूर्वी ईडीला चौकशी कामी केलेलं सहकार्य बघता न्यायालयाने केवळ पीआर बॉण्ड घेण्याचे निर्देश दिले. तसंच या गुन्ह्यात मला केवळ राजकीय द्वेषातून अडकवलं असल्याने माझ्यासोबतच माझ्या बारामती ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करु नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती, तीही न्यायालयाने मान्य केली, याबाबत न्यायालयाचे आणि योग्य पद्धतीने सत्य बाजू मांडल्याबद्दल माझ्या वकीलांचेही मनापासून आभार. विरोधात बोलत असल्याने सरकारने कितीही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही आणि सरकारविरोधातील आवाजही बंद होणार नाही. लडेंगे…जितेंगे…अशी प्रतिक्रिया दिली आहे.