इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्रात आता काय बघायला मिळणार आहे याची आता कल्पना करता येत नाही. असे सांगत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहणी खडसे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत पोस्ट केली आहे. यात म्हटले आहे की, लातूर येथील विश्रामगृहात खा. सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी तिथे आले व त्यांनी कृषीमंत्र्यांनी केलेल्या कृतीबाबत तटकरे यांना जाब विचारला.
यावेळी या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करून दाखवल्या तर अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. असे प्रकार महाराष्ट्रात कधीच पहायला मिळायचे नाहीत.Tom, Dick, Harry च्या कृपेमुळे महाराष्ट्रात आता हे सगळं घडत आहे. मला भीती आहे की उद्या उत्तर प्रदेश, बिहारचे लोक म्हणू नये की आमच्या इथे महाराष्ट्रासारखी परिस्थिती नको असेही त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय घडलं
दरम्यान लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते फेकून माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळाबाबत जाब विचारला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. आता या घटनेचे प्रसाद नांदेडमध्ये सुद्धा उमटत आहेत.