इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सध्या राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनापासून अवघ्या ५० फुटांवर हा कचऱ्याचा ढीग आहे. असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, सकाळी माध्यमांनी विधीमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे ही बाब समोर आणली. त्यानंतर अपेक्षा होती विधिमंडळ परिसरात असलेला कचरा तत्काळ उचलला जाईल. मात्र झालं उलट यांनी आपल्या चुका लपवण्यासाठी माध्यमांना वार्तांकन करण्यापासून रोखलं आणि या ठिकाणी कचरा झाकण्यासाठी मोठे पडदे लावले.
लपवाछपवी करण्यात या सरकारला अवॉर्डच दिले पाहिजे. आपल्या चुका सुधारणार नाहीत पण त्यावर पांघरूण घालण्यात हे माहीर आहेत !
तर दुस-या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अरे सत्ताधाऱ्यांनो ! विधानभवनाचा ‘कचरा’ करू नका…काल विधानभवनात उपमुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा साचला असल्याचे निदर्शनास आले होते. आज दुसरा दिवस उजाडला तरी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. उलट माध्यम प्रतिनिधी याबाबत वृत्तांकन करत असताना त्यांना ताब्यात घेतले जात आहे. साधा कचरा उचलला जात नसेल तर अधिवेशनासाठी केला जाणारा करोडोंचा खर्च जातो कुठे ? असा सवालही त्यांनी केला आहे.