इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्राजंल खेवलकर यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. प्रज्ञा खोसले यांच्या सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॅाटेल २८ वेळा बुक करण्यात आल्याचा दावा केला आहे. या हॅाटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावण्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.या तक्रारीवरुन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी. विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या आदेशानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व रोहिणी खडसे या पुन्हा आमने – सामने आल्या आहे. या आदेशावर रोहिण खडसे यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ? आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार ! सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे. अशी प्रतिक्रिया दिली आहे.