इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांनी दिला आहे. त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीमध्ये जे जनमत महायुतीच्या विरोधामध्ये होतं ते जनमत काहीही करून पलटवायचं आणि मतं मिळवायची ह्या एकाच हेतूने विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक प्रलोभन देणाऱ्या योजना सरकारच्या वतीने लोकांसाठी जाहीर करण्यात आल्या. त्या योजनांमध्ये प्रामुख्याने लाडकी बहिण योजना, तीर्थयात्रा योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफीची योजना अशा एक ना अनेक योजनांचा समावेश करण्यात आला. एकीकडे प्रचाराच्या जाहिरातीसाठी सरकारी तिजोरीतून वारेमाप खर्च सुरू असताना दुसरीकडे या योजनांच्या माध्यमातून भविष्यातील आर्थिक नियोजनाचा कसलाही विचार न करता फक्त योजना अंमलात आणून मतांची गोळाबेरीज लावून घ्यायची आणि निवडणुका जिंकायच्या हा एकच उद्देश. त्यात त्यांना यश देखील मिळालं. परंतु ज्या लाडकी बहीण योजनेमुळे आज महायुती सरकार सत्तेवर आलं. ज्या माझ्या माता भगिनींनी कुठलाही विचार न करता महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केलं. आज त्यांचीच फसवणूक करण्याचा डाव सरकारने मागील काही दिवसांपासून आखला आहे.
निवडणुकीपूर्वी कुठल्याही आर्थिक नियोजनाशिवाय केवळ मतांच्या राजकारणासाठी वापरल्या गेलेल्या या योजनांमुळे आता सरकार चांगलंच अडचणीत आलं आहे. ज्यांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या त्या युतीतील नेत्यांना आता या योजनेचा आर्थिक भार सोसवेनासा झालेला आहे आणि त्यामुळेच त्यांनी माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे कसे कमी करता येतील, त्यांना अपात्र कसं करता येईल, त्यांना घाबरवून- धमकावून या योजनेपासून कशाप्रकारे दूर ठेवता येईल ह्यासाठी ना ना प्रकारच्या क्लुपत्या लढवायला सुरुवात केली आहे. यासाठी महायुतीतील मंत्र्यांची सध्या चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं पाहिला मिळत आहे. उदाहरण द्यायचं तर माजी मंत्री छगन भुजबळ साहेब यांचं देता येईल. भुजबळ साहेब म्हणतात… आम्ही दंडासहित रक्कम वसूल करू तर अजित दादा म्हणतायत ज्यांचे अडीच लाख रुपयांच्या वरचे उत्पन्न आहे त्यांनी तात्काळ या योजनेतून माघार घ्यावी. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री यांची परिस्थिती दुष्काळात तेरावा महिना अशी झालीय. मंत्री तटकरे कधी म्हणतायत की आम्ही पैसे परत घेणार नाहीत, कधी म्हणताय पैसे परत घेतले जातील तर कधी म्हणतायत की ज्यांचे उत्पन्न अड़िच लाखा पेक्षा जास्त आहे अश्या लाडक्या बहिणींनी स्वतः लाभ घेणे थांबवावे. तर कधी म्हणतायत केसरी आणि पिवळ रेशनिंग कार्ड असलेल्या महिलांना अडचण नाही पण इतर महिलांचे पैसे तक्रारी आल्या तर परत घेऊ.
एकंदरीतच काय तर महिला बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांची स्वतःजवळ मंत्री पद असून देखील..असून घोटाळा आणि नसून खोळंबा अशी गत झाली आहे. कारण आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वारेमाप पैसा उधळण्याच्या स्वभावामुळे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्याच्या चुकीच्या नियोजनामुळे जे अर्ज करतील त्यांना पैशांच सर्रास वाटप केलं केवळ मतं आणि आता पैसे द्यायची वेळ आली की सरकारी तिजोरीत नुसताच ठणठणाट.. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मतदाराना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीपूर्वी आपल्या भाषणातून २१०० रुपये सरकार आल्यावर देऊ अशी घोषणा देखील करत राहिले. त्यांच्या या आगाऊ घोषणाबाजीमुळे अजित पवारांची मात्र राज्याच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे पैशांची जुळवा जुळव करताना तारांबळ उडाली आहे. त्यामुळेच अजित पवारांनी खाजगीत सूर आळवला आहे की आपण योजनेची पैसे वाढवून देण्याची घोषणा कधी केलीच नाही. त्यामुळे योजनेचे अधिकचे पैसे देऊ कसे? दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यामुळे आदिती तटकरे यांच्या समोर प्रश्न आहे!
आता जर या योजनेला नियमावलींची कात्री लावली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गुलाबी रंगात न्हाहून निघालेल्या अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लाडक्या बहीणींची मतं मागायची तरी कशी? आणि कोणत्या तोंडाने ? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकर्ता म्हणून माझा या सरकारला निर्वाणीचा इशारा आहे…खबरदार.. लाडक्या बहीण योजनेतील माझ्या एकाही भगिनीला योजनेपासून वंचित ठेवलं तर.. गाठ तुमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत आहे.