नवी दिल्ली – रोहिणी जिल्हा न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोट घडविण्याचे कटकारस्थान एका शास्त्रज्ञाने केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हा शास्त्रज्ञ संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ) मध्ये कार्यरत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भारतभूषण कटारिया या शास्त्रज्ञास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी आरोप केला आहे की, वकील अमित वशिष्ठ यांना मारण्याच्या उद्देशाने कटारियाने टिफीन बॉक्समध्ये आयईडी (बॉम्ब) न्यायालयाच्या 102 क्रमांकाच्या खोलीत ठेवला होता.
पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 डिसेंबर रोजी झालेल्या स्फोटात हवालदार राजीव जखमी झाले होते. रोहिणी कोर्टात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन करून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले तेव्हा दिसून आले की, संशयित कटारिया ( वय 47 ) यांनी 9 डिसेंबर रोजी सकाळी 9.33 वाजता वकिलाच्या वेशात कोर्टात प्रवेश केला असताना त्याच्या हातात दोन पिशव्या होत्या. मात्र 10:35 वाजता तो बाहेर आला तेव्हा त्यांच्या हातात एकच बॅग होती. कटारिया यांनी कोर्ट रूम नंबर 102 मध्ये त्यांची एक बॅग सोडली होती, त्यामध्ये एक टिफिन होता ज्यामध्ये त्यांनी आयईडी ( बॉम्ब ) ठेवला होता.
कोर्टातून बाहेर पडल्यानंतर त्याने रिमोटद्वारे स्फोट केला. दिल्ली पोलिसांनी कटारियाच्या घराची झडती घेतली तेव्हा तेथून घटनेशी संबंधित गुन्हे आणि आयईडीही जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे रोहिणी कोर्टात स्फोट घडवण्याचा शास्त्रज्ञ 40 दिवसांपासून कट रचत होता. बॉम्ब तयार करण्यासाठी त्याने विविध ठिकाणांहून साहित्य आणले होते. त्याने काही वस्तू ऑनलाइन खरेदी केल्या होत्या. त्यानंतर त्याने रिमोटवर चालणारे स्फोटक तयार केले.
तपासात असे आढळले की, स्फोटादरम्यान डिटोनेटरचा स्फोट झाला, स्फोटक साहित्याचा मोठा झाला नसून किरकोळ स्फोट झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नुकसान अत्यल्प होते. पूर्ण स्फोट झाला असता तर मोठी हानी झाली असती. शास्त्रज्ञाने टिफिन बॉम्ब रिमोटवर आधारित बनवला. यात मोटारसायकलमध्ये वापरले जाणारे लोखंडी खिळे, काचपात्र व बॅटरी, काचेचे तुकडे, वायर सर्किट, रिमोट व पांढऱ्या रंगाच्या अमोनियम नायट्रेट पावडरचा वापर करण्यात आला होता.
या संदर्भात पोलिस आयुक्तांनी सांगितले की, तपासादरम्यान, विशेष सेलच्या पथकाने सुमारे दोन किलोमीटरच्या परिघात न्यायालयाच्या परिसरात आणि आजूबाजूला लावलेल्या शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे 1 हजार तासांचे फुटेज तपासले. एक फुटेज जुळण्यासाठी पुढील फुटेज तपासण्यात आले. त्याच वेळी पथकाने दोन तासांत न्यायालयाच्या आवारात येणाऱ्या एक हजाराहून अधिक वाहनांमधून येणाऱ्या नागरिकांची विचारपूस केली आणि त्यांच्या कोर्टात येण्याचे प्रयोजन काय ? अशी देखील विचारणा केली गेली.