सिन्नर – तालुक्यातील मिरगाव येथे गुरुवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकास पाचारण केले. त्याने पाथरे रोडवर अंदाजे शंभर ते दोनशे मीटर पर्यंत धाव घेतली मात्र दरोडेखोरांना कोणताही सुगावा लागला नाही.
या दरोडयाबाबत समजलेली माहिती अशी की, मिरगाव शिवारात आपल्या शेतजमिनीत वस्तीवर राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी बाजीराव म्हातारबा वडीतके (वय ७८) हे त्यांची मुलगी रत्ना विठ्ठल कोळपे (वय ४५) हे दोघे घरी एकटे असतानाच रात्री दीड वाजेच्या सुमारास अचानक सात ते आठ जणांनी घरात प्रवेश केला. यावेळी तीक्ष्ण हत्याराने दरवाज्याचे कडी कोयंडे तोडत घरात प्रवेश केला. लाकडी दांडक्याच्या सहाय्याने दोघांनाही धक्काबुक्की करत जबर मारहाण केली. यावेळी त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने व दहा हजार रुपये रोख असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला. या दरोड्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.