विनोद मालपुरे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
१ ते १० जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते ठिकठिकाणी उध्वस्त झाले असून रस्त्यावर डोंगरावरील माती आली आहे. पुलांचे भरावाबरोबर नदीवरील सिमेंट बंधारे देखील वाहून गेले आहेत. ३८६ मिमी पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ जनतेवर आली असल्यामुळे तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांचे सर्वेक्षण व परीक्षण करुन रस्ते, पूल, फरशी यांच्या दुरुस्तीची मागणी आमदार नितीन पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. गेल्या ४५ वर्षात तालुक्यातील वाडी ,पाडे ,गाव ,वस्ती ,नगरे यांना जोडणारे रस्ते तयार झाल्याने तालुक्यातील रस्त्यांचे दारिद्र्य हटले. रस्त्यांचे रुप बदलून गेल्याने तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावले गेले.त्याच वाडी , पाडे, गाव, वस्तीवरील रस्त्याची मुसळधार पावसामुळे दुरावस्था झाली आहे. रस्तावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने ठिक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले, रस्ते खचून गेले आहेत.
तालुक्यातील राज्यमार्गची लांबी १२५ कि मी असून प्रमुख जिल्हा मार्गची लांबी -८० कि मी आहे. साल्हेर -केळझर -ततानी -डांगसौंदाणे -कळवण-ओतूर -मुळाने,कनाशी -मोहबारी -पिंपळे तसेच बोरगाव -चणकापूर -अभोणा -कोल्हापूर फाटा,चणकापूर -ओझर -बोरदैवत -खिराड -घागबारी हे प्रमुख मार्ग आहे. नाशिक -कळवण -सटाणा -नामपूर तसेच नांदुरी -अभोणा -कनाशी -वरखेडा -जयदर -मानूर व काठरेदिगर -कुत्तरबारी-डांगसौंदाणे तसेच सौंदाणे -देवळा -कळवण -कनाशी -हातगड हे प्रमुख रस्ते आहेत.
मुसळधार पावसामुळे रस्ते काय तर पूलाचा भराव देखील राहीला नाही, नदी नाल्यावर बांधलेल्या पूलाचा भराव नदी नाल्याना पूर आल्याने वाहून गेल्याने गावागावांचा संपर्क तुटण्याच्या घटना तालुक्यातील घडल्या. डोंगर उतारावरुन येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते देखील बंद झाल्याच्या तक्रारी आदिवासी जनतेने केल्या आहेत.तालुक्यातील राज्यमार्ग क्र. २१ सप्तश्रृंगी गड नांदुरी अभोणा कनाशी मानूर अलियाबाद रस्ता, राज्य महामार्ग क्र. २२ देवळा कळवण कनाशी हातगड सुरगाणा रस्ता, प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १६९ दरेगाव बिलवाडी तिऱ्हळ बु देसगांव रस्ता,प्रजिमा-८ बोरगाव चणकापूर अभोणा कळवण रस्ता, प्रजिमा-९ चणकापूर ओझर बोरदैवत खिराड घागबारी रस्ता, प्रजिमा-१७० रामा-२२ ते मळगांव गायदरपाडा धुरंदर काठरेदिगर रस्ता,काठरेदिगर कुत्तरबारी डांगसौंदाणे सटाणा रस्ता राज्यमार्ग क्र. १९ या ग्रामीण जिल्हा मार्ग असलेल्या ,राज्यमार्ग असलेले रस्ते काही ठिकाणी चांगले तर काही ठिकाणी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता खचला आहे ,रस्त्यांच्या साईड पट्ट्यावर खर्च करून देखील उपयोग झालेला नाही ,चढ उताराचा रस्ता होवून खडीवर येवून खड्डे जागोजागी तयार झाली आहे त्यामुळे छोट्यामोठ्या अपघाताच्या घटना देखील घडत असल्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.