लखनऊ (उत्तर प्रदेश) – रस्ते आणि खड्डे यांचे खूपच जवळचे नाते आहे. अगदी एकमेकांना अनुरूप असे हे दोघेही गुण्यागोविंदाने नांदतात. आपल्यापैकी सर्वांनी असा एकही पावसाळा पाहिला नसेल, ज्यात रस्त्यांवर खड्डे पडले नाहीत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ही कोटी ही आता घासून गुळगुळीत झाली आहे. म्हणजे आपल्याला खराब रस्त्यांची इतकी सवय झाली आहे की चुकून एखादा रस्ता चांगला दिसला तरी आपल्याला तो खरोखरच चांगला रस्ता आहे का यावर विश्वास बसायला वेळ द्यावा लागतो. कारण देशातील जनतेला हे चांगलेच ठाऊक आहे की रस्त्यांच्या कामांमध्ये शंभर टक्के भ्रष्टाचार होतोच. जनतेच्या या विश्वासाला राजकारणी आणि सरकारी अधिकारी कधीही तडा लावत नाही हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे.
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये रस्त्याचे लोकार्पण करण्यासाठी पोहोचलेल्या भाजप आमदार सूची चौधरी यांनी रस्त्यावर नारळ फोडण्याचा प्रयत्न केला असता नारळाऐवजी रस्ताच तुटला. रस्त्याचे काम निकृष्ट झाले असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार चौधरी यांनी केला. या वेळी आमदार चौधरी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी धरणे दिले. दरम्यान, बिजनौरचे जिल्हाधिकारी उमेश कुमार यांनी एका समितीचे गठण केले असून ही समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे.
या घटनेचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युजर्स उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारवर टीका करत आहेत. कवी कुमार विश्वास याबद्दल लिहितात, “नारळाचे खूप खूप अभिनंदन”. रोहिणी सिंह लिहितात, “बिजनौरमध्ये आश्चर्यकारक घटना घडली. १,६४ कोटी रुपयांचा खर्च करून बांधकाम विभागाने रस्ता बनवला. भाजप आमदार त्याचे लोकार्पण करण्यासाठी पोहोचल्या. लोकार्पण करण्यासाठी जसे नारळ फोडले, त्याच्या आघाताने रस्ताच तुटला. उत्तर प्रदेशचा विकास तुटून तिथेच पडला. आता प्रकरणाची चौकशी होत आहे”.
आम आदमी पक्षाचे नेते सुशील गुप्ता यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. ते लिहितात, “खड्डेमुक्त रस्ते बनविण्याचे आश्वासन देणारे योगी सरकार नवीन रस्त्यांच्या निर्मितीत उच्चस्तरीय भ्रष्टाचार करण्यासाठी सजग आहे. आता उत्तर प्रदेशच्या जनतेला दिल्ली मॉडेलसारख्या हमीची गरज आहे”. काँग्रेस नेते संजीव सिंह म्हणाले, “योगी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. पेपरमध्ये भ्रष्टाचार, सार्वजनिक कामांमध्ये भ्रष्टाचार. वरून खालपर्यंत सगळेच भ्रष्टाचारात बरबटले आहेत”.
अनुप यादव नावाचे ट्विटर युजर लिहितात, “बिचारा भाजपचा रस्ता म्हणत असेल…हमें अपनों ने तोडा, विपपक्षियों मे कहां दम था. फोड दिया मुझको ऐसे जैसे नारियल नहीं, बम था”. उमाशंकर सिंह लिहितात, “रस्त्याच्या गुणवत्तेत काहीच समस्या नव्हती. नारळ खूपच बळकट होते”. अजित अंजुम लिहितात, “रस्त्यावर नारळ फोडाल तर रस्ता तुटणारच आहे. नारळापेक्षा रस्ता बळकट केला तर मोठे कमिशन कसे मिळेल”?