नवी दिल्ली – देशातील रस्त्यांची दुरावस्था हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही एका पावसातच रस्त्यांची चाळणी होते. वर्षानुवर्षे अनेक गावांमध्ये रस्ते तयार होत नाहीत. सामान्य नागरिक न थकता आंदोलने, निवदने देऊन रस्त्याची मागणी लावून धरतात. प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे उदाहरण आपण नेहमीच पाहतो. परंतु आता याच सामान्य, गरिब नागरिकांकडून पैसे घेऊन केंद्र सरकार रस्ते तयार करणार आहे. हे ऐकून तुम्ही अचंबित होताल. पण हे खरे आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीच तशी घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले, की केंद्र सरकार एका वेगळ्या प्रकल्पावर काम करत आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकार पायाभूत सुविधा प्रकल्पांवर अंमलबजावणी करण्यासाठी आता सामान्य नागरिकांकडून पैसे घेणार आहे. त्यामध्ये सहा टक्क्यांच्या दराने व्याज मिळणार आहे.
ते म्हणाले, की आता आम्ही सामान्य आणि गरिब नागरिकांकडून पैसे घेऊन रस्ते तयार करणार आहोत. त्यासाठी आम्ही त्यांना सहा टक्के व्याजाने पैसे देणार आहोत. म्हणजे हे व्याज बँकांच्या व्याजापेक्षा अधिक असेल. गरिब नागरिकांकडून रस्त्यांमध्ये गुंतवणूक करवून घेणार आहोत. अशा रितीने त्यांना व्याजही मिळेल आणि निश्चित परतावाही मिळेल. देशातील सामान्य नागरिकांना याचा नक्कीच मोठा फायदा होईल.
कारगिलजवळ जोजिला बोगद्याचे निर्माण कार्य सुरू झाले आहे. त्यासाठी चार वेळा निविदा निघून ११ हजार कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. त्यामध्ये ५ हजार कोटी रुपयांची बचत करण्यात आली आहे. शून्य ते आठ अंश इतक्या कमी तापमानातही कामगार सलग काम करत आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार बोगदा साडेतीन वर्षात सुरू होणार होता. परंतु २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.