मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, खरं म्हणजे ही एक राष्ट्रीय समस्या बनली आहे. त्यातही गंभीर बाब म्हणजे रस्त्यावर फिरणारे भटकी जनावरे अपघातात मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहेत, असे दिसून येते. विमा कंपनीच्या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील महानगरांमध्ये भटके कुत्रे, गायी आणि उंदीर यांसारखे प्राणी रस्ते अपघातांचे प्रमुख कारण बनले आहेत. आघाडीची टेक-फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अॅकोच्या ‘अको अपघात निर्देशांक २०२२’ अहवालात हे उघड झाले आहे.
एका अहवालानुसार, देशातील रस्ते अपघातांचे मुख्य कारण प्राणी होते, विशेषत: चेन्नईमध्ये प्राण्यांमुळे सर्वाधिक ३ टक्क्यांहून अधिक अपघात झाले आहेत. त्यात म्हटले की, दिल्ली आणि बंगळुरूमध्ये जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या २ टक्के आहे.देशातील महानगरांमध्ये जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांपैकी ५८.४ टक्के अपघात हे कुत्र्यांमुळे झाले, तर २५.४ टक्के अपघात गायींमुळे झाले. आणखी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ११.६ टक्के अपघात हे उंदरांमुळे झाले, असे अहवालात म्हटले आहे.
कंपनीच्या अहवालानुसार, हा अपघात निर्देशांकांत बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईसह प्रमुख महानगरांमधील अपघातांचा तपशील आहे. यामध्ये दिल्लीतील अपघातांचे प्रमाण २०.३ टक्के तर मुंबईत १८.२ टक्के असल्याचे समोर आले आहे. देशातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या अॅकोच्या ‘अॅको अॅक्सिडेंट इंडेक्स’ मध्ये हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.
आपल्या देशातील आघाडीची विमा कंपनी असलेल्या अॅकोकडे जानेवारी ते जून या दरम्यान अपघातासंबंधी आलेल्या १.२७ लाख क्लेमचा संदर्भ या अहवालासाठी वापरण्यात आला आहे. या वाहन चालकांनी त्यांच्या वाहनाच्या अपघातासाठी भटक्या जनावरांना कारणीभूत ठरवलं आहे. या अहवालात देशातील प्रमुख दहा महानगरांमध्ये होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये भटक्या जनावरांमुळे सर्वाधिक म्हणजे तीन टक्के अपघात झाले असून दिल्ली आणि बंगळुरुमध्ये हे प्रमाण दोन टक्के आहे.
या अपघातासाठी भटक्या जनावरांसोबतच रस्त्यांवरील खड्डे, वेगाने गाडी चालवणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणे ही कारणंदेखील आहेत असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. देशाची राजधानी दिल्लीतील सेक्टर १२ म्हणजे नोएडा आणि मुंबईतील घाटकोपर पश्चिम ही ठिकाणं सर्वाधिक अपघाताची ठिकाणं असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. महानगरांचा विचार करता बंगळुरुची स्थिती सर्वात चांगली आहे. रस्त्यांवर अपघात झाला की आपण खराब रस्त्यांना दोष देतो. या संबंधी सर्वच बाबतीत योग्य उपाययोजना केल्यास अपघाताचे हे प्रमाण कमी करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.