नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – वाहन अपघातांच्या प्रकरणांचा निपटारा आता सोप्या पद्धतीने होणार असून, निपटाऱ्याचा वेगही वाढणार आहे. वाहन अपघातांच्या प्रकरणांमध्ये ऑनलाइन वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये अपघाताच्या प्रकरणांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच सर्व संस्थांना याचा एकत्रितरित्या अलर्टही मिळणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. यामध्ये अपघातस्थळाच्या साइट मॅपिंगसह जियो टॅगिंगचा समावेश असेल. २४ राज्यांच्या वाहन अपघातांशी संबंधित आकडेवारी या वेब पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
या उपाययोजनेमुळे वाहन अपघातांच्या बनावट दाव्यांवर अंकुश लागणार आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करून वरील माहिती दिली आहे. न्यायमूर्ती किशन कौल आणि न्यायमूर्ती एम एम सुंद्रेश यांच्या खंडपीठाने ३१ मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अहवालातील उतारेही वाचून दाखवले. या प्रकरणाच्या इतर पैलूंवर काम करण्यासाठी केंद्राने न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला आहे. २१ जुलै रोजी न्यायालय या प्रकरणावर पुन्हा सुनावणी घेणार आहे.
विमा कंपन्या आणि इतर पक्षकारांनी वाहन अपघातांच्या प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी विचार करावा, असे न्यायालयाने सांगितले. वाहन अपघातांची प्रकरणे लवकर निपटारा करण्याशी संबंधित एका याचिकेवर न्यायालयाची सुनावणी सुरू आहे. आधी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने वाहन अपघातांशी संबंधित सर्व आकडेवारी एकाच जागी उपलब्ध करून देण्यासाठी जनरल इन्श्युरन्स कॉर्पोरेशन (जीआयशी) कडून एक अॅप तयार करण्याचे आदेश दिले होते.
जीआयसीने एक खासगी विकसकाच्या मदतीने मोबाईल अॅप बनवण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती केंद्राने न्यायालयाला सुपूर्द केलेल्या अहवालात दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालात वाहन अपघातासंदर्भात एक वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेबपोर्टलवर डिटेल अॅक्सिडेंट रिपोर्ट (डीएआर)चे डिजिटलायजेशन होणार आहे, अशी माहिती केंद्राने दिली.
या पोर्टलवर सर्व अपघातांशी संबंधित माहिती असेल. यावर इंटिग्रेटेड रोड अॅक्सिडेंट डाटाबेस (आयआरएडी) उपलब्ध असेल. सर्व संबंधित अधिकारी जसे, पोलिस, रुग्णालय, रस्ते अधिकारी यांना प्रत्येक स्वरूपाची छोटी छोटी माहिती ई-डीएआरमध्ये द्यावी लागणार आहे. एका प्रकारे ई-डीएआरचा आयआरएडीच्या ई व्हर्जनमधील विस्तार असेल.
वाहन अपघाताच्या बनावट दाव्यांवर अंकुश लावण्यासाठी पोर्टलवर अनेक उपाय आहेत. एफआयआर क्रमांकाशी लिंक करून पडताळणी करणे, अपघातात सहभागी असलेले वाहन आणि अपघाताची तारीख इत्यादीचा समावेश असेल. हे पोर्टल सारथी आणि वाहन यासारख्या सरकारी पोर्टलशी इंटरलिंक असेल. त्यामध्ये वाहनचालक, परवाना आणि वाहन नोंदणीची माहिती मिळणार आहे.
या पोर्टलवर विविध भागधारकांसाठी १९ अर्ज उपलब्ध आहे. त्यामध्ये पूर्ण देशासाठी संपूर्ण माहितीचा अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जनरेट झालेला असेल. त्यामध्ये आवश्यक पूर्ण माहिती असेल. अपघातस्थळाची साइट मॅपसह जियो टॅगिंगही असणार आहे. याद्वारे अपघातस्थळ आणि तपास अधिकाऱ्यांच्या अंतराची माहिती कळणार आहे.
मोबाईल फोनवर इंटरनेटच्या सुविधेशिवाय यावर कागदपत्रे, फोटो, अपघातस्थळाचा व्हिडिओ, अपघातग्रस्त वाहन, जखमी, पीडित आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती तत्काळ अपलोड होऊ शकणार आहे. त्याच्या आउटपूटचे विश्लेषण, देखरेख आणि अहवाल डॅशबोर्डच्या माध्यमातून केले जाणार आहे. यामुळे भविष्यातील गोष्टी समजून घेण्याची आणि भविष्यातील धोरणे बनविण्यासाठी मदत मिळणार आहे.