इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. पशुखाद्य घोटाळा प्रकरणी नुकताच जामीन मिळाल्यानंतर त्यांच्याभोवती सीबीआयने फास आवळला आहे. लालू प्रसाद यांच्याविरुद्ध सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या १७ ठिकाणांवर सीबीआयने छापेमारी केली आहे.
जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांची मुलगी मिसा भारती यांच्या १७ ठिकाणांवर छापे टाकले. तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या पथकाने अर्थातच यावर भाष्य करण्यास नकार दिला. मात्र पाटणा आणि गोपालगंजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे. लालू प्रसाद रेल्वे मंत्री असताना २००४ ते २००९ दरम्यान रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याशी संबंधित हे छापे आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांवर लालू प्रसाद यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आरोप आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार असताना असेच सीबीआयचे छापे टाकण्यात आले होते. त्यावेळी नितीश कुमार मुख्यमंत्री होते तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत होते. 2017 मधील छापे IRCTC घोटाळ्याशी संबंधित होते.
आज सकाळी ७ वाजल्यापासून छापेमारी सुरू झाली. सीबीआयचे पथक राबडी देवी यांच्या 10 सर्कुलर रोडवरील निवासस्थानी पोहोचले तेव्हा राबडी देवी, त्यांचा आमदार मुलगा तेज प्रताप आणि मुलगी मीसा भारती तेथे उपस्थित होते. मीसा भारती नंतर नवी दिल्लीला रवाना झाली. लालूंचा धाकटा मुलगा आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव सध्या लंडनमध्ये आहेत. विद्यापीठात भाषण देण्यासाठी ते तिथे गेले आहेत.
सीबीआयचे एक पथक लालू प्रसाद यांच्या मूळ गावी गोपालगंज, फुलवारिया येथेही पोहोचले आहे. सीबीआयच्या छाप्याची बातमी व्हायरल होताच राबरी निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने आरजेडी समर्थक जमा झाले आणि त्यांनी भाजप आणि सीबीआयच्या विरोधात घोषणाबाजी केली. नुकताच लालू यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी झारखंड हायकोर्टातून जामीन मिळाला आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भरतीमध्ये कथितरित्या भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते मुख्यमंत्री असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. एनआयए वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ‘रेल्वेमध्ये नोकरीच्या बदल्यात जमीन’ घोटाळा प्रकरणी ही छापेमारी केली आहे.
लालू प्रसाद यांना पशुखाद्य घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात नुकताच जामीन मिळाला आहे. पशुखाद्य घोटाळ्याचे हे अखेरचे प्रकरण असून, त्यात त्यांना जामीन मिळाला आहे. ते आता कारागृहाच्या बाहेर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
सीबीआयने छापेमारी केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लालू प्रसाद यादव हे १९९० ते १९९७ सालापर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते. दरम्यान लालू प्रसाद यांच्यावर छापेमारी करण्यावरून राजदने टीका केली आहे. हा दमदार आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीबीआय पक्षपातीपणे काम करत असल्याचा आरोप राजद नेते आलोक मेहता यांनी केला आहे.