इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे यापुढील सर्व आयुष्य कोठडीतच जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार भ्रष्टाचार प्रकरणात लालूंना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि ६० लाखांचा दंड ठोठावला आहे. लालूंना झारखंडमधील सर्व प्रकरणांशी संबंधित शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९५० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात लालू प्रसाद यांना आतापर्यंत साडेबत्तीस वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यावर १.६५ कोटींचा दंड सुद्धा लावण्यात आला आहे.
देवघर कोषागारातून अनधिकृतरित्या पैसे काढण्याच्या प्रकरणात लालू प्रसाद यांना सीबीआय न्यायालयाने सुनावलेल्या साडेतीन वर्षांच्या शिक्षेचा कालावधी वाढवण्याच्या मागणीची याचिका अद्याप झारखंड उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यांच्यासह आर के राणा, बेक ज्युलियस, महेश प्रसाद, फूलचंद सिंह आणि सुबीर कुमार भट्टाचार्य यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर जगदीश शर्मा यांना याच प्रकरणात सात वर्षांची शिक्षा मिळाली आहे.
सीबीआयकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सांगण्यात आले की, चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यांच्यासह सर्व आरोपींवर उच्चस्तरीय कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे सर्वांना शिक्षासुद्धा समान असली पाहिजे. लालू यांच्यासह सर्व आरोपींना किमान ७ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी सीबीआयने केली आहे. उच्च न्यायालयात अद्याप सुनावणी सुरू होऊ शकली नाही. काही महिन्यांपूर्वी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सूचिबद्ध झाले होते. परंतु खंडपीठाच्या एका न्यायाधीशांनी या प्रकरणातून माघार घेत सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठात स्थानांतरित करण्यात आले होते.
शिक्षा सुनावण्याच्या आधी लालू प्रसाद यांचे वकील प्रभात कुमार यांनी न्यायालयात युक्तीवाद केले. ते म्हणाले, की लालू प्रसाद ७५ वर्षांचे आहेत. त्यांना १७ प्रकारचे आजार आहेत. रक्तदाब, मधुमेहसुद्धा आहे. त्यांना कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. सीबीआयचे वकील बीएमपी सिंह यांनी मात्र दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ चालली. हा सर्वात मोठा घोटाळा आहे. घोटाळा करणाऱ्या अशा दोषींना काय शिक्षा मिळते हे समाजसुद्धा पाहतोय. त्यामुळे दोषींना कमाल शिक्षा मिळणे अपेक्षित आहे.