इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट सृष्टीत दर्जेदार चित्रपटांची वानवा असल्याची ओरड प्रेक्षकांमधून कायम होत असते. मात्र नुकताच रितेश – जेनेलियाच्या ‘वेड’ने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. गेले अनेक दिवस त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रचंड चर्चेत होता. ३० डिसेंबरला तो सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. अवघ्या दोनच दिवसात या चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे.
बॉलीवूडमधील हॉट कपल म्हणून रितेश – जेनिलियाची ओळख आहे. प्रेक्षकांची नस माहित असलेल्या रितेश आणि जेनिलियाचा आणखी एक नवा चित्रपट आला आहे. त्यांच्या या नव्या ‘वेड’ चित्रपटाची चांगलीच चर्चा होती. या चित्रपटाचं ते जोरदार प्रमोशन करत होते. या चित्रपटातून रितेशने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर त्याची पत्नी जेनिलिया देशमुख हिने मराठी मनोरंजन सृष्टीत निर्माती म्हणून पाऊल टाकलं आहे. रितेश आणि जेनिलिया प्रेक्षकांचं मन जिंकण्यात कुठेही कमी पडलेले नाहीत. त्यांच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे.
‘वेड’ या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी ३.५ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी केलेल्या कमाईमुळे हा चित्रपट महाराष्ट्रातील दमदार ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये समाविष्ट झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने ४.४ कोटींचा गल्ला जमवला. आतापर्यंत एकूण मिळून या चित्रपटाने ७.९ कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या जाहिरातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटाच्या टीझरला, सगळ्या गाण्यांना आणि ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे चित्रपटगृहातही हा चित्रपट चांगलीच कामगिरी करणार असा सगळ्यांना विश्वास होता. या चित्रपटात रितेश – जेनिलिया सोबतच अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता सलमान खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला आहे. आता हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कामगिरी करणार का, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
https://twitter.com/shiekhspear/status/1610939134201286656?s=20&t=49fDg-JKaCzXTZplNTkrdg
Riteish Deshmukh Ved Movie Box Office Record Collection
Marathi Film Hit