इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याला किडनॅप केले असल्याचे कळाल्यानंतर काल खळबळ निर्माण झाली होती. ऋषिराज बेपत्ता झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिस कंट्रोल रुमला आला, त्यानंतर पोलिसांची सर्व टीम सक्रिय झाली. पण, दरम्यान या घटनेनंतर तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून ऋषिराज सावंतचे अपहरण झाले नसून तो परदेशात असल्याचे सांगण्यात आले.
आज तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी काल घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. तो म्हणाला की, काल जेव्हा माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत यांच्याशी संपर्क होत नव्हता. तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्यानंतर आम्ही सिंहगड पोलिस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली. पण, नंतर आम्हाला कळालं की तो बँकॅाकला काही कामानिमित्ताने गेला आहे. दहा दिवस अगोदरच तो दुबईला जाऊन आला होता. पुन्हा बँकॅाकला का चाललाय असे घरचे विचारतील म्हणून त्याने घरी न सांगता प्रायव्हेट प्लेन बुक करुन बँकॅाकला निघाला होता. आमच्या घरात कुठलाही कौटुंबिक वाद नाही.
क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण वर्ग
काल या घटनेनंतर पुणे पोलिस उपायुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पोलिस उपायुक्त म्हणाले होते की, पोलिस कंट्रोल रुमला चार वाजेच्या सुमारास माहिती मिळाली की, तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेलं आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तातडीने माहिती घेणे सुरु केले. ते पुण्याहून फ्लाईटने गेले आहेत. फ्लाईट आता कोणत्या दिशेने जात आहे याच कन्फर्मेशन सुरु आहे. त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेली आहे. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अपहरणाची एफआय़आर दाखल करण्यात आली आहे. क्राईम ब्रांचकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे.