मुंबई – कुठलेही गाव श्रीमंत होते ते त्या गावातील समृद्ध शेतीमुळे. भारतात अशी अनेक गावे आहेत जी केवळ कृषी क्षेत्राच्या भरवश्यावर श्रीमंत झालेली आहेत. पण सध्या पैश्याने श्रीमंत अशा एका गावाची जगभरात चर्चा आहे आणि ते गाव भारतात आहे. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील माधापर गावाची ही कहाणी नेमकी काय आहे, जाणून घेऊया…
माधापर गावात केवळ 7 हजार 600 घरे आहेत. एवढ्याशा घरांसाठी तब्बल १७ बँका आहेत. केवळ बँकांच्या शाखा उघडून होत नाही, त्यात पैसाही आवश्यक असतो. तर तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या बँकांमध्ये केवळ माधापर गावातील लोकांनी गुंतविलेले तब्बल 5 हजार कोटी रुपये आहेत. या गावातील बहुतांश लोक लंडन, अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये राहतात. पण त्यांनी आपल्या गावातील घरांशी नाळ तोडलेली नाही.
अर्थात या समृद्धीमध्ये केवळ विदेशात कमावलेला पैसाच आहे असेही नाही. कारण या गावातील शेतीही छान आहे. शेतातून येणारा बराचसा माल मुंबईला निर्यात होतो. त्यामुळे बँकांमध्ये पैसा जमा होत असतो. विदेशात राहणारे गावकरीही तिकडे कामवलेला पैसा जमा करीत असतात. त्यामुळे 17 बँकांमध्ये तब्बल 5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा आहे. विदेशात नोकऱ्या असल्या तरीही कुटुंबातील कुणीतरी एक सदस्य शेतीमध्ये पूर्णवेळ काम करतो. कुणीच आपले शेतही विकलेले नाही.
अत्याधुनिक गोशाळा
पैसा आला की इतर सोयी-सुविधा येतातच. या गावात शाळा आणि कॉलेजसह अत्याधुनिक गोशाळादेखील आहे. गावाचा स्वतःचा कम्युनिटी हॉल आहे. मंदिर आणि मैदानांसोबत जागतिक दर्जाच्या सुविधा असलेले आरोग्य केंद्रही आहे. गावातील पोस्ट ऑफिसमध्येही 200 कोटींचे फिक्स डिपॉझीट आहे.
पर्यटनाचे केंद्र
माधापर इतके समृद्ध गाव आहे की ते बघायला जगभरातील लोक येतात. या गावात प्ले स्कूल पासून इंटर कॉलेजपर्यंत हिंदी आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षण उपलब्ध आहे. गावाचे आपले स्वतःचे शॉपिंग मॉल आहे आणि तिथे जगभरातील सर्व मोठे ब्रांड उपलब्ध आहेत. गावात तलाव तर आहेच, पण एक शानदार स्विमींग पूलही आहे.
अशी आली समृद्धी
1968 मध्ये लंडनमध्ये माधापर व्हिलेज असोसिएशन नावाची एक संघटना स्थापन झाली. एक कार्यालय स्थापन करून तिथे गावातील लोकांना एकमेकांना भेटण्याची सोय करून देण्यात आली. यातूनच गावाविषयी आस्था कायम राहिली. गावाच्या समृद्धीसाठी काय करता येईल यासाठी सातत्याने विचार होऊ लागला. आज माधापरची जी श्रीमंती आपण बघतोय, त्याचे बीज 1968 मध्ये रोवण्यात आले होते.