नवी दिल्ली – भारतीय संस्कृतीत दिवाळी सणात लक्ष्मीपूजनाला कुबेराचे देखील पूजन केले जाते. कुबेरहा देवदेवतांचा खजिनदार मानला जातो. त्याच्या खजिन्यात अगणित अशी धनदौलत आणि संपत्ती असल्याचे मानले जाते, म्हणून लक्ष्मी बरोबरच कुबेराचे देखील पूजन करण्याची प्रथा आहे. परंतु प्रत्यक्षात जणू काही कुबेरा इतकीच संपत्ती असलेल्या असलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बद्दल तुम्हाला माहित आहे का? कोण आहे ती व्यक्ती?
वैयक्तिक संपत्ती 300 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असलेले इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क हे जगातील पहिले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, स्टॉक रॅलीनंतर त्यांच्या कंपनीचे मार्केट कॅप 10 अब्ज डॉलरने वाढले, त्यामुळे मस्कची संपत्ती 302 अब्ज डॉलरच्या वर गेली आहे. मस्कने बिल गेट्सला मागे टाकत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत वरचे स्थान पटकावले आहे. शुक्रवारी मायक्रोसॉफ्टने अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली. तर अगदी अलीकडे, टेस्लाला हर्ट्झकडून 10 हजार कारची ऑर्डर मिळाली, त्यानंतर त्याचे शेअर्स नवीन उच्चांकावर पोहोचले. एलोन मस्कची संपत्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यापेक्षा 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
सध्या बेझोसची एकूण संपत्ती सुमारे 199 अब्ज डॉलर आहे. विशेष म्हणजे मस्कची संपत्ती इजिप्त, पोर्तुगाल, झेक रिपब्लिक, ग्रीस, कतार आणि फिनलंड या देशांच्या वार्षिक जीडीपीपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर त्याची संपत्ती पेपल आणि स्ट्रीमिंग जायंट नेटफ्लिक्सच्या निव्वळ संपत्तीपेक्षा जास्त आहे. यापुर्वी मस्क हे पेपलचे सह-संस्थापक होते.
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस 195 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. बर्नार्ड अर्नॉल्ट (167 अब्ज डॉलर्स ), फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठ्या लक्झरी वस्तू कंपनी LVMH मोएट हेनेसीचे अध्यक्ष, यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (136 अब्ज डॉलर्स ) चौथ्या क्रमांकावर आहेत.
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज 131 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन 126 अब्ज डॉलर्स सह सहाव्या स्थानावर आहेत. अमेरिकन मीडिया दिग्गज आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग 121 अब्ज डॉलर्ससह सातव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकन उद्योगपती आणि गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर 118 अब्ज डॉलर संपत्तीसह आठव्या, लॅरी एलिसन 115 अब्ज डॉलर संपत्तीसह नवव्या आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे 105 अब्ज डॉलर्स संपत्तीसह दहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे टॉप 10 पैकी 9 व्यक्ती या अमेरिकेतील आहेत.