औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तांदूळ विक्री दुकानातून हवाला रॅकेट चालवणाऱ्या एकास औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गुन्हे शाखेने औरंगाबाद शहरातील शहगंजहून चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुरेश राईस किराणा या दुकानावर छापा मारून एक कोटी रूपये साडेनऊ लाख रूपयांची रोकड हस्तगत केली. किराणा व्यापारी आशिष सावजी मशीनने नोटा मोजत असतानाच गुन्हे शाखेने कारवाई केली. सावजी हवाला रॅकेट चालवत असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली. तशा नोंदी असलेल्या डायरी जप्त करण्यात आली. पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत पेन, पेन्सील, नोटा मोजण्याच्या मशिन्ससह दोन डायऱ्या सापडल्या. ३० नोव्हेंबर २०२१ पासून त्यात नोंदी आहेत. फार सविस्तर न कळतील अशा नावांसमोर लाखोंच्या नोंदी पोलिसांना आढळल्यात.
दिवसभर रेकीनंतर कारवाई
सावजीच्या दुकानात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार चालत असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्याचआधारे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक अविनाश् आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि त्यांच्या दुकानाबाहेर रेकी केली. ग्राहक म्हणून येणारे अनेकजण काहीच न घेता परतत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. झडती दरम्यान दुकानाच्या समोरील भागात किराणा सामान आणि मागे नोटांची बंडलं रचून ठेवलेली समोर आली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास आयकर तसेच जीएसटी विभाग करणर आहे. पैशांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, व्यवहारांमधील सत्यता तपासण्यात येणार आहे.