मुंबई – महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीसह होल्डिंग कपंनी या चारही कंपन्यांसह महाऊर्जाने भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम (टाईम बाऊंड कॅलेंडर) जाहीर करावे; उमेदवारांना तीनही कंपन्यांच्या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे हा विचार परीक्षेच्या तारखा निश्चित करताना करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.
ऊर्जा कंपन्यांमधील अनुकंपा तत्त्वावरील करायच्या नेमणुका, नवीन पदांची भरती तसेच पदोन्नती या अनुषंगाने आढावा बैठक ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी महावितरणचे संचालक (मानव संसाधन) भालचंद्र खंडाईत, महापारेषणचे कार्यकारी संचालक सुगत गमरे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक बी. वाय. मंथा हे मंत्रालयातून तर तीनही ऊर्जा कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
डॉ. राऊत पुढे म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या भरत्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी न्यायालयाकडे आपली बाजू सक्षमपणे मांडून पाठपुरावा करावा. भरती प्रक्रिया करताना शासनाच्या निर्देशानुसार योग्य पद्धतीने राबवल्यास न्यायालयात याचिका दाखल होण्याचे प्रमाण होईल.
अनुकंपा तत्त्वावरील भरतीचा आढावा घेताना डॉ. राऊत म्हणाले की, कंपनीमध्ये कर्तव्य बजावलेला कर्मचारी दुर्देवाने मयत झाल्यानंतर त्याच्या वारसाला लवकरात लवकर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिल्यास खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. अनुकंपा नियुक्त्यांबाबत संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला पाहिजे. या नियुक्त्या वर्षानुवर्षे रखडणे ही बाब त्या कुटुंबावर अन्यायकारक ठरते. यासाठी लवकर नियुक्त्या देण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी राज्यस्तरावर काही धोरण बनवता येते का याबाबत चर्चा करुन माहिती सादर करावी, असेही ऊर्जामंत्री यावेळी म्हणाले.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने महापारेषण कंपनीच्या मनुष्यबळाची पुनर्रचना (रिस्ट्रक्चरिंग) चांगल्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे कंपनीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत करुन आनंद व्यक्त केला जात असल्याचे श्री. गमरे यांनी सांगितले. यावर इतर दोन्ही कंपन्यांनी देखील आपल्या मनुष्यबळाचे रिस्ट्रक्चरिंग करुन नवीन भरती तसेच समकक्ष पदांचे एकत्रीकरण करुन कर्मचाऱ्यांना बदलीच्या आणि पदोन्नतीच्या समाधानकारक संधी उपलब्ध होण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.