शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेल्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणी शासन प्रभावीपणे करणार आहे. तेव्हा शासनाच्या या कल्याणकारी उपक्रमात अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने काम करावे. असा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिल्या.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथे जिल्ह्यातील तिसऱ्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दराम सालिमठ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, तसेच पदाधिकारी शाळीग्राम होडगर, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कैलास तांबे, सतिष कानवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले की, वाळू व्यवसायातून सुरु असलेले राजकारण आणि गुन्हेगारीकरण थांबविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील वाळू विक्री केंद्रातून २० हजार ब्रास वाळू उपलब्ध केली आहे. यामधून राज्य सरकारच्या तिजोरीत ६०० रुपये दराने थेट रक्कम जमा झाली आहे. राज्य सरकार हे सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेत आहे.राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका सरकार घेत असल्याचेही महसूलमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी २२ जून रोजी पुण्यामध्ये खासगी आणि सहकारी दूध संघ चालकांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पशुखाद्य कंपन्यांनाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. दूध उत्पादकांवरील अन्याय सहन करणार नाही ही भूमिका घेवून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभे राहील. अशी ग्वाही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शाळीग्राम होडगर यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.