नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नुकताच सर्वांचा निरोप घेतला. ते आपले यापुढील आयुष्य लुटियन्स दिल्लीतील एका पूर्ण सुसज्ज बंगल्यात घालवतील. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर आता त्यांना राष्ट्रपती वेतन आणि निवृत्ती वेतन कायदा, १९५१ नुसार निवृत्तीवेतन, मोफत उपचार, उच्च श्रेणी सुविधा, दरमहा अडीच लाख रुपये पेन्शन मिळणार आहे.
रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ नुकताच पूर्ण झाला. राष्ट्रपती भवनातून ते आता सुसज्ज बंगल्यात राहणार आहेत. त्यांच्या सेवेसाठी एक खाजगी सचिव, अतिरिक्त खाजगी सचिव, एक वैयक्तिक सहाय्यक आणि दोन शिपायांसह सचिवीय कर्मचारी असणार आहेत. या सुविधांबरोबरच निवृत्त राष्ट्रपतींना मोफत वैद्यकीय लाभ आणि उपचार मिळण्याचा अधिकार आहे. तसेच ते भारतात कुठेही सर्वोच्च वर्गात विमानाने, रेल्वेने प्रवास करू शकतात.
या मिळतात सुविधा
१९५१ च्या कायद्यानुसार, निवृत्त राष्ट्रपतीदेखील आयुष्यभर आलिशान बंगला वापरू शकतात. त्याचे भाडे त्यांना द्यावे लागत नाही. त्यांना दोन दूरध्वनी (इंटरनेट आणि ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी), एक मोबाइल फोन आणि एक कार मिळण्याचा हक्क असेल. कायद्यात असेही नमूद केले आहे की सेवानिवृत्त राष्ट्रपतीच्या जोडीदाराला निवृत्त राष्ट्रपतींना मिळणाऱ्या ५० टक्के दराने कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळू शकते, शिवाय उर्वरित आयुष्यासाठी वैद्यकीय लाभ आणि उपचारदेखील मिळतात.
नवीन निवासस्थानी स्वागत
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दिल्लीतील जनपथ रोडवरील त्यांच्या नवीन निवासस्थानी स्वागत करण्यात आले. यावेळी भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही तिथे गेल्या होत्या. तेथे केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि व्हीके सिंह यांनी स्वागत केले. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनीही ट्विटरवर ही माहिती दिली आहे. तीन दशकांपूर्वी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आपल्या कुटुंबासह या घरात राहत होते.
Retired President Ram Nath Kovind Pension and other Benefits