नवी दिल्ली – कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत निवृत्त झालेल्या वैद्यकीय कर्मचार्यांना कोविड केअर सेंटरमध्ये तैनात करण्यासाठी लष्कराने परत बोलावले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लष्कराचे तिन्ही दल सज्ज असल्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोविड लढ्यात आता लष्कराचे निवृत्त वैद्यकीय कर्मचारी मोठे योगदान देणार आहेत.
लष्कराच्या तिन्ही दलांच्या तयारीसंदर्भात सीडीएस रावत यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी लष्कराच्या आतापर्यंतच्या तयारीचा आणि अभियानांचा त्यांनी आढावा घेतला. संरक्षण मंत्रालयाने या बैठकीबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, सीडीएस रावत यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांत निवृत्त झालेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सर्व वैद्यकीय कर्मचार्यांना परत बोलावण्यात येत आहे. या सर्वांना त्यांच्या जवळच्या कोविड सेंटरवर तैनात केले जात आहे. तसेच लष्कराच्या इतर निवृत्त डॉक्टरांनासुद्धा आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाईनच्या माध्यमातून सेवा देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लष्कराचे मुख्यालय, कोअर मुख्यालय आणि विभागीय मुख्यालयात तैनात सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णलयात सेवा देण्यासाठी तैनात केले जात आहे. नौदल आणि हवाईदलाच्या वैद्यकीय अधिकार्यांनासुद्धा अशाच प्रकारे रुग्णालयात सेवा देण्यासाठी तैनात केले जात आहे. लष्कराकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडरचा रुग्णालयांना पुरवठा केला जाईल. ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी हवाई दलाकडून देशात आणि परदेशात राबविल्या जाणाऱ्या विशेष अभियानाचाही आढावा घेण्यात आला.
लष्कराच्या परिचारीकांनासुद्धा रुग्णालयांमध्ये तैनात करण्यात आले आहे. तसेच लष्कराकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा केंद्रांची उभारणी केली जात आहे. सामान्य नागरिकांना या वैद्यकीय सुविधांचा लाभ दिला जाणार आहे. केंद्रीय आणि राज्याच्या सैनिक कल्याण मंडळाच्या माध्यमातून माजी सैनिकांची मदत घेऊन तळागाळातील लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचना संरक्षण दलांना करण्यात आल्या आहेत.