इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेता रितेश देशमुख, त्यांची पत्नी जेनिलिया डिसोझा यांच्या कंपनीवर भारतीय जनता पार्टीने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. रितेश आणि जेनेलिया या दाम्पत्याच्या देश अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसंदर्भात हा आरोप करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबाचे वर्चस्व असणाऱ्या बँकांकडून या कंपनीला तातडीने कर्ज कसं मिळालं? तसेच अगदी महिन्याभराच्या कालावधीत एमआयडीसीमध्ये या कंपनीला जमीन कशी मंजूर करण्यात आली? १६ उद्योजकांना टाळून रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला प्राधान्य का देण्यात आलं? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत. यासाठी एक पत्रकार परिषदही घेण्यात आली होती.
५ एप्रिल २०२१ ला जागेसाठी अर्ज केल्यानंतर १५ एप्रिलला भूखंड मंजूर करण्यात आला. अवघ्या १० दिवसांमध्ये भूखंड मंजुरी देण्यात आल्याचा भाजपाचा दावा आहे. २२ जुलै २०२१ रोजी जागेचा ताबा कंपनीला देण्यात आला. या कंपनीने पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँकेत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्जासाठी अर्ज केला. त्यानंतर लगेचच म्हणजे तीन आठवड्यांमध्ये म्हणजे २७ ऑक्टोबरला कर्ज मंजूर करण्यात आले. कंपनीकडे केवळ ७.५ कोटींचं भागभांडवल असताना कंपनीने १५ कोटी रुपये भूखंडासाठी भरल्याचा भाजपाचा आरोप आहे.
महाविकास आघाडीचं सरकार असताना २ लाख ५२ हजार ७२७ चौरस मीटरचा भूखंड या कंपनीला मंजूर झाला. एमआयडीसीमध्ये एवढ्या वेगाने काम होत नाही. भूखंड देताना ई-टेंडरिंग प्रक्रिया असते. जी बँक जिल्ह्यातील मुख्य बँक आहे त्या बँकेच्या माध्यमातून अनेक संस्था उभारण्यात आल्या. असं असतानाच एका वर्षात रितेश आणि जेनेलियाच्या कंपनीला १२० कोटींचं कर्ज कसं देण्यात आलं. या कर्जासाठीचं तारण आणि त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही, असं भाजपाने म्हटलं आहे.
रितेश आणि जेनेलियाची ५० टक्के मालकी असणाऱ्या या कंपनीची २३ मार्च २०२१ रोजी स्थापना करण्यात आली. १६ उद्योजकांना डावलून भूखंड दिल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या कंपनीत रितेश आणि जेनेलियाची ५० टक्के भागीदारी असल्याचं सांगत या कंपनीला १२० कोटींचं कर्ज कसं दिलं? असा प्रश्न विचारला. कंपनीचे साडेसात कोटी रुपये भाग भांडवल असताना देशमुखांच्या देश अॅग्रो कंपनीबाबत सवलत का देण्यात आली असं भाजपाने विचारलं आहे. पत्रकार परिषदेत जे कागद समोर ठेवण्यात आले त्याची पडताळणी सुरू आहे. बँकेसोबत कंपनीचा बॉण्ड होता त्याचे कागदपत्रं दिले आहेत. १६ जणांच्या नावांसह संपूर्ण यादी भाजपाने दिली आहे. यासंदर्भात एबीपी माझाने रितेश देशमुखचे दोन्ही आमदार भावांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र यावर प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
माजी पालकमंत्री संभाजीराव निलंगेकर, औसाचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय अभिमन्यू पवार यांनी थेट आरोप केलेले नाहीत. मात्र, भाजपा पदाधिकाऱ्याने केलेल्या आरोपांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. हा भाग सोयाबीनच्या शेतीसाठी ओळखला जातो. त्यासाठी प्रोसेसिंग युनिट उभे केले जातात. हे युनिट उभे करताना कोणाला नियमांबाहेर जाऊन मदत करण्यात आली आहे का? असा प्रश्नही विचारला जात आहे. महिन्याच्या आत जागा मिळाली, महिन्याच्या आत कर्ज मिळालं, अशी तत्परता सहकार क्षेत्रातील या बँकेने किती जणांसाठी दाखवली आहे? देशमुखांच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कोणालाही कर्ज दिलं नाही, असं भाजपाने म्हटलं. यासंदर्भात सहकार मंत्र्यांकडे, उद्योग मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
Reteish Genelia Deshmukh Allegation Controversy
Entertainment BJP