मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या इ. 10 वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) व इ. 12 वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज, मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला आहे.
ही परीक्षा दिनांक 24 जून 2025 ते 08 जुलै 2025 (इ.10 वी) आणि 24 जून 2025 ते 16 जुलै 2025 (इ.12 वी) या कालावधीत संपन्न झाली होती. विद्यार्थ्यांना इ. 12 वी: http://hscresult.mkcl.org, इ. 10 वी: http://sscresult.mkcl.orgव मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ: https://www.mahahsscboard.in
या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या अनिवार्य विषयांच्या उत्तरपत्रिकेच्या गुणपडताळणीसाठी, छायाप्रतीसाठी आणि पुनर्मूल्यांकनासाठी https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून 30 जुलै 2025 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येतील. अर्जासोबत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येणार आहे.पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रती घेणे आवश्यक असून, छायाप्रती मिळाल्यानंतर पुढील पाच कार्यदिवसांत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
ज्यांनी सर्व विषयांत यशस्वी होऊन उत्तीर्णता संपादन केली आहे, अशा विद्यार्थ्यांना “Class Improvement Scheme” अंतर्गत गुणसुधार करण्यासाठी फेब्रुवारी-मार्च 2026, जून-जुलै 2026 आणि फेब्रुवारी-मार्च 2027 या तीन संधी उपलब्ध असतील.
या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी, खाजगी (नाव नोंदणी प्रमाणपत्र धारक), श्रेणीसुधार योजनेतून व ITI द्वारे Transfer of Credit घेतलेले विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज भरण्याच्या तारखा मंडळाकडून लवकरच स्वतंत्रपणे घोषित करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे.