विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
महाराष्ट्र , दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील कमीत कमी २६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन, संचारबंदी आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा प्रकारे देशातील जवळपास ९० टक्के लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कठोर निर्बंधांच्या खाली आली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात कोरोना संचारबंदीचा कालावधी वाढवून तो १७ मे करण्यात आला आहे. दिल्लीतही १७ मेपर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. हरियाणातील लॉकडाउनचे कठोर निर्बंध १७ मेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये १० मेपासून ते २४ मेपर्यंत कठोर लॉकडाउन लावण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात १६ एप्रिलला फक्त रविवारीच साप्ताहिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढत गेला. उत्तर प्रदेशात रविवारी (९ मे) गेल्या २४ तासात २३,३३३ नवे रुग्ण आढळले असून, ३४,६३६ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. कठोर निर्बंधांमुळे रुग्णसंख्यावाढीला ब्रेक बसला असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाउन लावल्यानंतर दिल्लीतील कोरोनाची साखळी तुटण्यास सुरुवात झाल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. २६ एप्रिलला संसर्ग दर ३५ टक्के होता. आता तो २३ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. आता नियम शिथिल करता येणार नाही. ते केल्यास जे काही मिळविले आहे, ते पुन्हा गमविण्याची वेळ येईल, असे ते म्हणाले.
कठोर निर्बंध लावण्यात आलेले राज्ये
– कर्नाटकमध्ये १०-२४ मेपर्यंत लॉकडाउनसारखे निर्बंध
– महाराष्ट्रात ५ एप्रिलपासून १५ मेपर्यंत कठोर निर्बंध
– गोव्यात ९ मेपासून १५ दिवसांची संचारबंदी
– केरळमध्ये ८ ते १६ मेपर्यंत पूर्ण लॉकडाउन
– आंध्र प्रदेशात ६ मेपासून दोन आठवड्यांसाठी दुपारी १२ ते सायंकाळी ६ पर्यंत निर्बंध
– तेलगंणामध्ये १५ मेपर्यंत रात्रीची संचारबंदी
– मिझोरममध्ये १० ते १७ मेपर्यंत पूर्ण लॉकडाउन
– मणिपूरमध्ये सात जिल्ह्यांत ८ ते १७ मेपर्यंत संचारबंदी
– हिमाचल प्रदेशमध्ये ७ ते १६ मेपर्यंत लॉकडाउन
– बिहारमध्ये ४ ते १५ मेपर्यंत लॉकडाउन
– ओदिशामध्ये ५ मेपासून १४ दिवसांचा लॉकडाउन
– झारखंडमध्ये १३ मेपर्यंत लॉकडाउनसारखे निर्बंध
– छत्तीसगडमध्ये १५ मेपर्यंत वीकेंड लॉकडाउन
– पंजाबमध्ये १५ मेपर्यं वीकेंड लॉकडाउन आणि रात्री संचारबंदी
– मध्य प्रदेशमध्ये १५ मेपर्यंत जनता कर्फ्यू
– गुजरातमध्ये ३६ शहरांत १२ मेपर्यंत रात्री ८ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी
– जम्मू-काश्मीरमध्ये २० जिल्ह्यात १७ मेपर्यंत कोरोना संचारबंदी वाढविली