मुंबई – योग्य आहार, चांगले आयुष्यमानबद्दलच्या (ईट राइट इंडिया) सरकारी अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. आगामी जानेवारी महिन्यापासून रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणार्या मेन्यू कार्डमध्ये अन्नपदार्थांसोबत आता त्यामध्ये किती कॅलरीज आहेत याचीसुद्धा माहिती दिली जाणार आहे. आपण किती कॅलरीजचे अन्न खात आहोत हे ग्राहकांना समजू शकणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि निकष प्राधिकरणाने (एफएसएसएआय) हा नियम लागू करण्याची तयारी सुरू केली आहे. शाकाहारी उत्पादनांसाठी शुद्ध शाकाहारी असण्याचे चिन्ह लवकरच जारी करण्यात येणार आहे.
एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी फिक्की या औद्योगिक संघटनेच्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले, की ईट राइट इंडिया अभियानांतर्गत ग्राहकांना पौष्टिक अन्नाची संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. जानेवारीपासून ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थांच्या यादीत त्या अन्नपदार्थांत किती कॅलरीज आहेत याचीही माहिती दिली जाणार आहे. रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डमध्ये ही माहिती मिळेल.
सध्या रेस्टॉरंटच्या मेन्यूकार्डवर ताटात डाळीमध्ये १०० ग्रॅम डाळ आहे की १५० ग्रॅम हे लिहिलेले नसते. फक्त फुल आणि हाफ प्लेटबद्दल माहिती दिली जाते. शाकाहारी भोजनासाठी आवश्यक असलेला वेगन लोगो एफएसएसएआय लवकरच प्रसिद्ध करणार आहे. शाकाहारी नागरिकांची संख्या वाढत आहे. शाकाहारी भोजनाच्या प्रमाणाबद्दल काहीच उपलब्ध नाही, असे ते म्हणाले.
सिंघल म्हणाले, स्थानिक बाजारासाठी एक जोखीम व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत स्थानिक बाजारात विक्री होणार्या खाद्यपदार्थांच्या उत्पादनांचे प्रोफाइल, खाद्यपदार्थांबद्दलची संबंधित माहिती तसेच त्याला जोडले जाणारे निकष लिहिले जाणार आहेत. यामुळे खाद्यसुरक्षा निरीक्षकांकडून केले जाणारे अनावश्यक निरीक्षणाचे कामही आपोपाप समाप्त होईल. एफएसएसएआय लवकरच एक परवाना (परपिच्युअल लायसन्स) विकसित करण्यात येणार आहे. तो लागू झाल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता भासणार नाही.