इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मालिका तसेच सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह असतो. तो जिथेही जातो तेथील माहिती, व्हिडीओज आपल्या चाहत्यांसाठी पाठवत असतो. सध्या तो लंडन दौऱ्यावर असून नुकताच त्याने तेथील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण हा काही निव्वळ व्हिडीओ नाही तर ही आहे एक नोकरीची संधी. आश्चर्य वाटलं ना?
काय आहे नोकरीची संधी?
शशांक लंडनमधील एक भारतीय पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट या व्हिडिओत दाखवतो आहे. रेस्टॉरंटच्या काचेवर असलेली एक जाहिरात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. डोसा बनवणारा शेफ पाहिजे…अशी ही जाहिरात आहे. या जाहिरातीत त्या डोसा शेफला मिळणार पगारही लिहिला आहे. वर्षाला तब्बल २८,००० युरो म्हणजेच जवळपास २५ लाखांहून अधिक हा पगार आहे. इतका पगार वाचून नेटकऱ्यांनी भन्नाट कॉमेंट केल्या आहेत.
परदेशातही डोसा?
नोकरी किंवा शिक्षणासाठी लाखो भारतीय विदेशी स्थायिक झाले आहेत. या भारतीयांना आपल्या भारतीय पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी जगभरातील विविध भागांत इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये पदार्थांच्या किमती निश्चितच जास्त आहेत परंतु हे पदार्थ बनवणाऱ्या शेफनाही चांगले मानधन दिले जाते. या संदर्भात मराठी अभिनेता शशांक केतकर याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत माहिती दिली आहे.
चाहत्यांच्या गमतीशीर कमेंट्स
शशांक केतकर हा व्हिडीओ शेअर करताना चाहत्यांना म्हणतो की, “तसे माझे बरे चालले आहे पण, काय म्हणता मग व्हायचे का शिफ्ट?” यावर त्याच्या चाहत्यांनी विविध कमेंट्ससुद्धा केल्या आहे. शशांकच्या या व्हिडीओवर एका गृहिणीने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, “घरी डोसे बनवून काही मिळत नाही, किमान तिथे आमच्यासाठी काही होतेय का बघा.” तर काही युझर्स म्हणतायत, उगाच लहानपणी शिक्षण घेतले; त्यापेक्षा डोसे बनवायला शिकले पाहिजे, असे लिहीत इंग्लंडमध्ये डोसा शेफला मिळणाऱ्या पगारावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. तो सध्या मुरांबा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तसंच शशांक त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये करतोय. लंडनमधून तो अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. ‘मुरांबा’ या मालिकेतील रमा-अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय. मालिकेतील अक्षयची भूमिका करणारा अभिनेता शशांक केतकर सध्या लंडनमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत असल्यामुळे मालिकेच्या कथानकात तो कामानिमित्त बाहेरगावी गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. यानिमित्तानं प्रेक्षकांनाही लंडनच्या नयनरम्य ठिकाणांचं दर्शन होत आहे. तर परदेशातले मजेशीर, भन्नाट किस्से तो चाहत्यांसोबत शेअर करतो आहे.
Restaurant Masala Dosa Chef 28 Lakh Package