नाशिक : अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक या नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याचा विशेषत: सिन्नर तालुक्याच्या दुष्काळाचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक हा प्रकल्प सिन्नर तालुक्यासाठी वरदानच ठरणार आहे. शेती, सिंचन आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. प्रस्तावित दिल्ली-मुंबई इडस्टिअल कॉरिडॉर ही योजना मैलाचा दगड असून अपरवैतरणा-कडवा-देवलिंग या प्रकल्पातून दिल्ली-मुंबई इडस्टिअल कॉरिडॉरसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या सूचना खा. हेमंत गोडसे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
शहरातील जलसिंचन विभागाच्या सिंचन भवन कार्यालयातील सभागृहात नुकतीच अप्पर वैतरणा-कडवा-देवलिंक या नदीजोड प्रकल्पाच्या निगडीत असलेली सविस्तर अहवाल आढावा विषयीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, जलसंपदा विभागाचे मुख्यअभियंता डॉ. संजय बेलसरे, राष्ट्रीय जलविकास अधिकरणाचे अधीक्षक अभियंता एन.एम. राव, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, सचिन पाटील आदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नदीजोड प्रकल्पाकरिता कायमस्वरुपी वीजनिमिर्ती केंद्र असावेत यासाठी अंदाजपत्रकात सोलर प्लांटची तरतूद करुन ठेवावी, अशी मागणी राजेंद्र जाधव यांनी केलेली आहे. जागा उपलब्ध झाल्यास सोलर प्लांट उभारणीच्या मागणीला यापूर्वीच शासनाने तत्वत: मान्यता दिलेली असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी राज्यातील औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरला संधी मिळालेली आहे. परंतु दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरसाठी पुरसे पाणी नसल्याने दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरपासून जिल्हा वंचित राहिलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉर मैलाचा दगड असून कॉरिडॉरची जिल्ह्याला नितांत गरज आहे. यासाठी आरक्षित असलेल्या २.६ टीएमसी पाण्याला धक्का लावता कामा नये. अपरवैतरणा-कडवा-देवलिंग या नदीजोड प्रकल्पातून उपलब्ध होणारे पाणी दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरसाठी आरक्षित ठेवण्याची आग्रही मागणी यावेळी खा. गोडसे यांनी केली आहे. इगतपुरी, सिन्नर या तालुक्यातील परिसरात हजारो हेक्टर औद्योगिक क्षेत्र प्रस्तावित असून दिल्ली-मुंबई इन्डस्ट्रीअल कॉरिडॉरमुळे रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी खा. गोडसे यांनी दिली आहे.