मुंबई – खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला सेवा सुधारण्याचे बजावले होते. तसेच, विद्यमान ग्राहकांना जोपर्यंत दर्जेदार सुविधा प्राप्त होत नाही तोपर्यंत नव्या योजनांना रिझर्व्ह बँकेने रोखले होते. त्यामुळेच एचडीएफसी बँकेच्या ऑनलाईन नव्या योजना आणि नवे क्रेडीट कार्ड वाटप यास लगाम लागला होता. अखेर रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला नवे क्रेडिट कार्ड वाटप करण्याची परवानगी दिली आहे.
एचडीएफसी बँकेला गेल्या दोन वर्षात तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेने झटका दिला होता. एचडीएफसीचे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत. इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, मोबाईल अॅप यासह अनेक सुविधांची सेवा चांगली मिळत नसल्याच्या असंख्य तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे येत होत्या. एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळविल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाची माहिती समोर आली होती. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या तक्रारी घेत एचडीएफसी बँकेला नवे क्रेडिट कार्ड वाटप आणि ऑनलाईन नव्या योजनांना बंदी घातली होती. पुढील आदेशापर्यंत हे लागू करण्यात आले होते. बँकेने सेवेत सुधारणा करुन तसे रिझर्व्ह बँकेला पटवून दिले. रिझर्व्ह बँकेने खात्री केल्यानंतर नवे क्रेडिट कार्ड वाटपास एचडीएफसी बँकेला परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकेला दिलासा मिळाला आहे.