मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात ०.४० टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेपोचा दर हा आता ४.४० टक्के झाला आहे. याचा थेट परिणाम आता कर्जाच्या हफ्त्यांवर होणार आहे. यापूर्वी ज्यांनी कर्ज घेतले आहे आणि जे घेणार आहेत त्या सर्वांना याचा थेट फटका बसणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. हफ्ता नक्की किती वाढेल, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अर्थतज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
अर्थतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, समजा तुम्ही २० वर्षांच्या कालावधीसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. सध्या, जर तुम्ही ६.८ टक्के दराने व्याज देत असाल, तर तुमचा ईएमआय (हफ्ता)) २२ हजार ९०० रुपये आहे. आता रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर व्याजदर ७.२ टक्के अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत तुमचा ईएमआय हा थेट २३ हजार ६२० रुपये प्रति महिना भरावा लागेल. २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकाचा ईएमआय ७२० रुपयांनी वाढेल. जर तुम्ही रक्कम आणि कार्यकाळ बदलला तर ईएमआय मध्ये देखील फरक पडेल.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अचानक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी रेपो दरात ०.४० टक्के वाढीची घोषणा केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आर्थिक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने सलग 11व्यांदा प्रमुख धोरण दर रेपोमध्ये कोणताही बदल केला नाही.