मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन हजार रुपयांच्या नोटाबंदीची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून ग्राहकांना बँकेत त्या जमा करता येतील किंवा बदलून मिळतील. त्यामुळे देशभरात सध्या चलनी नोटांची चर्चा होत आहे. याचनिमित्ताने एक प्रश्न अनेकांना पडला आहे की, ज्यांच्या सहीने देशात नोटा छापल्या जातात त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांचा पगार किती असतो. आता याविषयी आपण जाणून घेऊया…
सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत शक्तीकांत दास. ते मूळचे ओडिशाचे आहेत. त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५७ रोजी भुवनेश्वर येथे झाला. ते तामिळनाडू केडरचे १९८० च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. शक्तिकांत दास हे वित्त आयोगाचे सदस्यही राहिले आहेत. गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवणारे म्हणून दास ओळखले जातात. शक्तिकांत दास यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००८ मध्ये त्यांना पहिल्यांदा अर्थ मंत्रालयात सहसचिव बनवण्यात आले. त्यावेळी पी. चिदंबरम अर्थमंत्री होते.
नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दुसरी टर्म मिळवणारे शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहेत. १९८० च्या बॅचचे आयएएस असलेल्या दास यांनी १० डिसेंबर २०१८ रोजी या पदाची सूत्रे हाती घेतली. २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्यात आला.
२०१८ मध्ये त्यांनी उर्जित पटेल यांची जागा घेतली होती. उर्जित पटेल यांची सप्टेंबर २०१६ मध्ये रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी वैयक्तिक कारणास्तव गव्हर्नर पदाचा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर दास यांची नियुक्ती झाली.
शक्तीकांता दास यांनी इतर विविध पदे जसे की आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालयात सहसचिव अर्थसंकल्प, तमिळनाडू सरकारच्या महसूल विभागातील आयुक्त आणि विशेष आयुक्त, सचिव, उद्योग विभाग, तामिळनाडू इत्यादी पदांवर काम केले आहे.
शक्तीकांत दास यांचा पगार दरमहा अडीच लाख रुपये आहे. मात्र, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, यावर्षी त्यांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा साडेतीन लाखांवर गेला आहे. याशिवाय आरबीआय गव्हर्नरला सरकारकडून निवास, वाहन, ड्रायव्हर आणि इतर सुविधाही मिळतात.
आरबीआय गव्हर्नरनंतर चार डेप्युटी गव्हर्नर आहेत. यामध्ये महेश कुमार जैन, एमडी पात्रा, एम राजेश्वर राव आणि टी रबी शंकर यांचा समावेश आहे. चार डेप्युटी गव्हर्नरांचे वेतन दरमहा २.२५ लाख रुपये आहे. डेप्युटी गव्हर्नरलाही सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जातात.
Reserve Bank of India RBI Governor Salary