मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुरेशा भांडवलाचा अभाव असणाऱ्या, उत्पन्नाची शक्यता नसणाऱ्या, आर्थिक अनियमितता आढळणाऱ्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या सहकारी बँकांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात येत आहे. लहान सहकारी बँका आरबीआयच्या रडारवर आल्या आहेत.
अनेक प्रकारच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने तीन सहकारी बँकांना एकूण पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. दंड ठोठावलेल्या दोन बँका महाराष्ट्रातील, तर एक बँक पश्चिम बंगालमधील आहे.
आरबीआयच्या निवेदनानुसार, फलटन येथील यशवंत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला उत्पन्न, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतुदी आणि इतर संबंधित मुद्द्यांवर दिशानिर्देशाचे पालन न केल्याबद्दल २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
एका दुसऱ्या निवेदनात आरबीआयने अशाच प्रकरणात मुंबई येथील कोकण मर्केंटाइल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेला २ लाखांचा दंड ठोठावला आहे. दुसऱ्या नियामक सूचनेमध्ये आरबीआयने कोलकाता येथील समता कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँकेला एक लाखाचा दंड ठोठावला आहे.
यापूर्वी पुरेसे भांडवल नसलेल्या आणि उत्पन्नाची शक्यता नसल्यालेल्या सांगली जिल्ह्यातील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला होता. नियमांचे उल्लंघन तसेच बँकिंग व्यवहारात आढळलेल्या अनियमितेमुळे आणखी दोन बँकांवरही एक मार्च रोजी कारवाई करण्यात आली होती. यामध्ये नागरिक सहकारी बँक आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादित पन्ना या दोन बँकांचा समावेश आहे. या दोन्ही बँकांकडून साडेपाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता.